राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भित्रे : स्वपक्षाच्या आमदाराची टीका - NCP goa state president coward criticizes party MLA | Politics Marathi News - Sarkarnama

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भित्रे : स्वपक्षाच्या आमदाराची टीका

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 17 डिसेंबर 2020

गोव्यात पक्षांतर्गत वाद उफाळला... 

मडगाव : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे गोवा प्रदेशाध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा हे भित्रे असून वाॅट्स अपवरच्या पोस्ट पाहून त्यांनी काही वक्तव्ये केली आहेत. आपण चुकीचे वागलो असल्यास त्यांनी आपल्याला पक्षातून बाहेर काढावे, असे आव्हान राष्ट्रवादी काॅंग्रेसचे बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी डिसोझा यांना दिले आहे. 

जिल्हा पंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या कोलवातून विजयी झालेल्या उमेदवार वानिया बाप्तिस्त यांच्या सोबत मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांची आलेमाव यांनी घेतलेल्या भेटीबद्दल डिसोझा यांनी नाराजी व्यक्त करून पक्षश्रेष्ठी या प्रकरणी निर्णय घेतील, असे वक्तव्य केले होते.

आलेमाव यांनी आज पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्याच्या भेटीबाबत स्पष्टीकरण देताना डिसोझा यांना आपल्यास पक्षातून काढण्याचे आव्हानही दिले. यावेळी वानिया बाप्तिस्त, दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या माजी अध्यक्ष व कोलवाच्या माजी जिल्हा पंचायत सदस्य नेली राॅड्रिग्ज, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे बाणावलीचे उमेदवार मिनिन फर्नांडिस उपस्थित होते. 

मुख्यमंत्र्यांची घेतलेली भेट ही भाजपला पाठिंबा देण्यासाठी नव्हती, तर सदिच्छा भेट होती. विकासकामासाठी मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा आवश्यक आहे. जिल्हा पंचायतीत कोलवातून  निवडून आलेल्या वानिया बाप्तिस्त यांनाही विकासकामासाठी सरकारचा पाठिंबा आवश्यक आहे. त्या उद्देशाने ही भेट घेतली होती.  मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्हा पंचायत सदस्यांना भेटीसाठी आवाहन केले होते, असे आलेमाव यांनी स्पष्ट केले. या सरकारला मी विषयानुरूप पाठिंबा दिलेला आहे.  आपण भाजपमध्ये कधीच जाणार नाही, हे अनेकवेळा स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रफुल्ल पटेल यांना याची कल्पना आहे, असेही आलेमाव यांनी सांगितले. 

‘आप’ची बाणावलीत चार हजारांच्या आसपास मते आहेत. जिल्हा पंचायत निवडणुकीत त्यांना ३०७१ मते मिळाली. घराघरांत जाऊन त्यांनी आपल्या मतदारांना मतदान केंद्रात आणले. म्हणून त्यांना एवढी मते मिळाली. जिल्हा पंचायत निवडणुकीत बाणावलीत ८ हजार मतदान झाले. पण, विधानसभा निवडणुकीत 16 हजार किंवा त्यापेक्षा जास्त मतदान होत असून या निवडणुकीत आपची झेप तोकडी पडेल, असे आलेमाव यांनी सांगितले. 

बाणावलीत  जनसंपर्कात कमी पडलो : चर्चिल 
जिल्हा पंचायत निवडणुकीत बाणावलीत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे उमेदवार मिनिन फर्नांडिस यांचा पराभव आमच्या अतिआत्मविशासामुळे झाला. आम्ही मतदारांशी संपर्क साधण्यात कमी पडलो अशी कबुली आलेमाव यांनी दिली. तथापि, जिल्हा पंचायत निवडणुकीत आम आदमी पार्टीने (आप) बाणावलीत बाजी मारली असली तरी विधानसभा निवडणुकीत या पक्षाकडून आपल्यास कोणताही धोका नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख