श्रुती मोदीची आधी कोरोना चाचणी अन् मगच चौकशी - ncb will qusetion shruti modi in sushant singh rajput case | Politics Marathi News - Sarkarnama

श्रुती मोदीची आधी कोरोना चाचणी अन् मगच चौकशी

वृत्तसंस्था
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी समोर आलेल्या ड्रग्ज अँगलची चौकशी एनसीबी करीत आहे. या प्रकरणी दररोज नवनवीन धक्कादायक बाबी समोर येत आहेत. 

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्जच्या अँगलचा तपास करणाऱ्या अमली पदार्थ विरोधी विभागाने (एनसीबी) सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिला अटक केली होती. सुशांतची माजी व्यवस्थापिका श्रुती मोदी हिची चौकशी करणारा अधिकारीच कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने आता एनसीबीने तिला चौकशीसाठी कोरोना चाचणी करुनच येण्याची अट घातली आहे. उद्या तिची चौकशी केली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

'एनसीबी'कडून रिया आणि तिचा भाऊ शौविक यांची चौकशी झाली होती. ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या बॉलीवूडमधील काही कलाकारांची नावे या दोघांनी उघड केली आहेत. बॉलीवूडमधील पार्ट्या आणि ड्रग्जची तस्करी यावरही या दोघांनी प्रकाश पाडला आहे. एनसीबीकडून काही कलाकारांना या प्रकरणी चौकशीसाठी या आठवड्यात बोलावण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

रिया चक्रवर्तीच्या चौकशीत तिने बॉलीवूडमधील कलाकारांची नावे उघड केली आहेत. यात अभिनेत्री सारा अली खान, श्रद्धा कपूर, राकुल प्रीत सिंग आणि फॅशन डिझायनर सिमॉन खंबाटा यांची नावे आहेत. त्यांना या आठवड्याच्या अखेरीस चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे. याचबरोबर अनेक इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या आणि इव्हेंट मॅनेजरही एनसीबीच्या रडारवर आले आहेत. बॉलीवूडमधील ड्रग्ज रॅकेटची पाळेमुळे खणून काढण्याच्या दिशेने एनसीबी पावले टाकत आहे, असे सूत्रांनी सांगितले. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टॅलेंट मॅनेजर जया साहा आणि श्रुती मोदी यांची उद्या पुन्हा चौकशी करण्यात येणार आहे. चौकशीआधी एनसीबीने तिला कोरोना चाचणी करण्यास सांगितले होते. कारण तिची चौकशी करणारा एनसीबीचा अधिकारी आधी पॉझिटिव्ह सापडला होता. खबरदारीचा उपाय म्हणून तिला कोरोना चाचणी करण्यास सांगण्यात आले होते. तिने कोरोना चाचणी केली असून, त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे तिची उद्यापासून चौकशी सुरू होणार आहे. 

याचबरोबर सेलिब्रेटी मॅनेजर करिष्मा प्रकाश आणि केडब्लूएएन टॅलेंट मॅनेजमेंट एजन्सीचे सीईओ ध्रुव चितगोपकर यांनाही उद्या चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. मात्र, करिष्मा प्रकाश हिने तब्येत बरी नसल्याचे कारण देऊन चौकशीला हजर होण्याबाबत असमर्थता दर्शविली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

सुशांतच्या घरी काम करणाऱ्या दीपेश सावंत याला एनसीबीने आधी अटक केली होती. दीपेश हा ड्रग्जची खरेदी आणि हाताळणी करीत होता. तो सुशांतला ड्रग्ज आणून देत होता. 'एनसीबी'ने या प्रकरणात सुरुवातीला कायझेन इब्राहिम, झैद विलाट्रा, अब्बास लखानी, अब्दुल बसित परिहार यांना अटक केली आहे. हे सर्वजण ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागी होते. त्यांच्याकडून अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचा भाऊ शौविक आणि सुशांतचा मॅनेजर सॅम्युएल मिरांडा हे ड्रग्ज खरेदी करीत होते. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती. 

सुशांत हा 14 जूनला मुंबईतील घरी मृतावस्थेत सापडला होता. याचा तपास मुंबई पोलिस करीत होते. या प्रकरणी पोलिसांनी 56 जणांचे जबाब नोंदविले होते. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा समावेश होता. 

Edited by Sanjay Jadhav
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख