दीपिका, सारा, श्रद्धा अन रकुलला क्लिनचिट नाहीच...पुन्हा चौकशीचा फेरा - ncb has not given clean chit to deepika sara rakul and shraddha | Politics Marathi News - Sarkarnama

दीपिका, सारा, श्रद्धा अन रकुलला क्लिनचिट नाहीच...पुन्हा चौकशीचा फेरा

वृत्तसंस्था
मंगळवार, 29 सप्टेंबर 2020

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्जचा अँगल समोर आला आहे. या प्रकरणी एनसीबीने काही अभिनेत्रींची चौकशी केली होती. 

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्जच्या अँगलचा तपास अमली पदार्थ विरोधी विभागाने (एनसीबी) अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह आणि श्रद्धा कपूर यांची चौकशी केली होती. या सर्वच अभिनेत्रींनी ड्रग्ज घेतल्याचा इन्कार केला आहे. त्यांच्या चौकशीत कोणतेच ठोस पुरावे समोर आले नसले तरी एनसीबीने त्यांना क्लिनचिट देणे टाळले आहे. या अभिनेत्रींना पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

'एनसीबी'कडून रिया आणि तिचा भाऊ शौविक यांची चौकशी झाली होती. ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या बॉलीवूडमधील काही कलाकारांची नावे या दोघांनी उघड केली आहेत. बॉलीवूडमधील पार्ट्या आणि ड्रग्जची तस्करी यावरही या दोघांनी प्रकाश पाडला आहे. एनसीबीकडून काही कलाकारांना या प्रकरणी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. यात अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंह आणि फॅशन डिझायनर सिमॉन खंबाटा यांचा समावेश होता. याचबरोबर अनेक इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या आणि इव्हेंट मॅनेजरही एनसीबीच्या रडारवर आले आहेत. 

बॉलीवूडमधील ड्रग्ज रॅकेटची पाळेमुळे खणून काढण्याच्या दिशेने एनसीबी पावले टाकत आहे. रकुल प्रीत सिंह, दीपिका पदुकोणची व्यवस्थापिका करिष्मा प्रकाश यांची चौकशी झाली होती. त्यानंतर दीपिका आणि करिष्मा यांची समोरासमोर चौकशी करण्यात आली होती. दीपिकाची सुमारे पाच तास चौकशी करण्यात आली होती. याचबरोबर सारा आणि श्रद्धा यांचीही सुमारे पाच तास चौकशी करण्यात आली होती.  

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीत सर्वच अभिनेत्रींना ड्रग्जंसदर्भात चॅट केल्याची कबुली दिली. मात्र, ड्रग्ज सेवन केल्याचा इन्कार केला आहे. या अभिनेत्रींनी केलेले व्हॉट्सअॅप चॅट हे त्यांच्याविरोधात ड्रग्ज घेतल्याचा पुरावा ठरू शकत नाही. यासाठी आणखी ठोस पुरावे एनसीबीला हवे होते. या चौकशीत केवळ सुशांतच्या ड्रग्ज सेवनाचे पुरावे समोर येत आहेत.

या अभिनेत्रींनी ड्रग्ज सेवन केल्याचे काहीच धागे सापडत नाहीत. यामुळे आता एनसीबीची डोकेदुखी वाढली आहे. मात्र, सर्वच अभिनेत्रींनी एनसीबीसमोर दिलेले जबाब हे जवळपास सारखेच असल्याचे स्पष्ट झाले आहे. एनसीबीला यात काही तरी संशयास्पद वाटत आहे. यामुळे एनसीबीने या अभिनेत्रींना क्लिनचिट देणे नाकारले आहे. या अभिनेत्रींना पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख