पवार-मोदी भेटीमागील कारण नवाब मलिकांनी केलं उघड - nawab malik clarifies about sharad pawar and narendra modi meeting | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

पवार-मोदी भेटीमागील कारण नवाब मलिकांनी केलं उघड

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 17 जुलै 2021

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. 

नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतली. पंतप्रधान कार्यालयाने या दोन्ही नेत्यांच्या भेटीचा फोटो ट्विट केला आहे. सुमारे तासभर झालेल्या या भेटीमुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे. यावर अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी खुलासा केला असून, भेटीमागील नेमके कारण उघड केले आहे. 

शरद पवार यांनी सकाळी साडेदहाच्या सुमारास नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान कार्यालयात जाऊन भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. या भेटीतील चर्चेचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. पवारांनी काल (ता.16) संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती. त्यानंतर वाणिज्यमंत्री व राज्यसभेतील सभागृह नेता पीयूष गोयल यांनी पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर आज पवार यांनी थेट पंतप्रधान मोदींची भेट घेतल्याने मोठी चर्चा सुरू झाली आहे. 

नवाब मलिक म्हणाले की, पीयूष गोयल हे काल पवारांना भेटायला आले होते. नेत्यांना भेटण्याची परंपरा आहे. संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीला शरद पवार आणि ए. के. अँटनी उपस्थित होते. सीमेवर परिस्थितीबाबत बैठकीत चर्चा झाली होती. पवार हे माजी संरक्षणमंत्री असल्याने त्यांच्याशी महत्वाचे बोलणे झाले.

पंतप्रधान मोदींसोबतची आजची पवारांची बैठक नियोजित होती.  सहकारी बँकांबाबत केलेले विषय यामागे होती.  बैठकीत ही लेखी मागणीही होती. रिझर्व्ह बँकेला जास्त अधिकार देण्यात आले आहेत. राज्याच्या कायद्यानुसार काही नियम असतात पण पैशाला सुरक्षित ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँक निर्णय घेतल असते. रिझर्व्ह बँकेच्या सहकार क्षेत्रातील नियमांमुळे ही बैठक होणे गरजेचे होते. स्वायत्ततेचा अधिकार यामुळे धोक्यात आले आहे, असे मलिक यांनी स्पष्ट केले. 

पुढील 2024 मधील लोकसभा निवडणुकीत काँग्रेस वगळता इतर पक्षांचे नेतृत्व पवार करणार असल्याची चर्चा सुरू आहे. याचबरोबर पवार हे राष्ट्रपतिपदाच्या शर्यतीत असल्याचीही चर्चा आहे. राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर हे पवारांना दोन वेळा भेटले होते. त्यानंतर किशोर यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची भेट घेतली होती. तेव्हापासून वेगवेगळी चर्चा सुरू आहे. 

हेही वाचा : मोदींसमोर तयारी दाखवणारे येडियुरप्पा बाहेर आल्यावर म्हणाले, कुठला राजीनामा! 

मागील काही दिवसांपासून राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. काँग्रेसला सत्तेत योग्य स्थान दिले जात नसल्याची अनेक नेत्यांची तक्रार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तर स्वबळाचीच भाषा सुरू केली होती. तसेच. त्यांनी पवारांवरही निशाणा साधला होता. या घडामोडींचा पवार-मोदी भेटीशी संबंध जोडला जात आहे. 

नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून सातत्याने स्वबळावर निवडणुका लढण्याची भाषा वापरत आहेत. त्यावरून महाविकास आघाडीचे प्रमुख मानले जाणारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यापासून आघाडीतील अनेक नेते नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी भेटायला आलेल्या काँग्रेस नेत्यांनाही पवारांनी जाब विचारला होता. त्यानंतरही नाना आपल्या घोषणेवर ठाम आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख