कॅप्टनच्या विरोधामुळे सिद्धूंना सलामीला उतरण्याआधीच पक्षानं बोलावलं परत!

पंजाब काँगेसमधील संघर्षावर हाय कमांडने शोधलेला तोडगा तकलादू ठरला आहे.
navjot singh sidhu meets congress party chief sonia gandhi and rahul gandhi
navjot singh sidhu meets congress party chief sonia gandhi and rahul gandhi

नवी दिल्ली : पंजाब (Punjab)  काँगेसमधील (Congress) संघर्षावर हाय कमांडने शोधलेला तोडगा तकलादू ठरला आहे. काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू (Navjyot Singh Sidhu)  यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवण्याच्या प्रस्ताव समोर आला होता. मात्र, मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग (Amarinder Singh) यांनी याला विरोध केला आहे. यामुळे सिद्धू यांनी आज थेट पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतली. अद्याप नेतृत्वाला या वादावर नवीन तोडगा काढता आलेला नाही. 

सिद्धू यांना प्रदेशाध्यक्षपद देण्याच्या निर्णयाने कॅप्टन नाराज झाले आहेत. त्यांनी याबद्दल पक्ष नेतृत्वाकडे तक्रार केली आहे. हा वाद आता थेट सोनिया गांधींकडे गेला आहे. सिद्धू यांनी आज सोनिया गांधी आणि राहुल गांधींची भेट घेतली होती. कॅप्टन यांनीही नुकतीच त्यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी पक्षाच्या अध्यक्षा सांगतील तो तोडगा मान्य असेल, असे म्हटले होते. सिद्धू यांनी सोनिया गांधींची भेट घेतली त्यावेळी पक्षाचे पंजाब प्रभारी हरीश रावत हेसुद्धा उपस्थित होते. या बैठकीनंतर बोलताना रावत म्हणाले की, सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपद देण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही. त्यांना प्रदेशाध्यपद देण्याबाबत मी कधीच बोललो नाही. याबाबत सोनिया गांधींनी निर्णय घेतल्यावर आम्ही तुम्हाला कळवू. 

सिद्धूंना अद्याप प्रदेशाध्यक्ष करण्याचा निर्णय घेतला नसल्याची भूमिका पक्षाने घेतली आहे. यामागे कॅप्टन यांनी नोंदवलेला विरोध कारणीभूत असल्याचे समोर येत आहे. यामुळेच तातडीने सिद्धू यांना सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या भेटीला बोलावण्यात आले. कॅप्टन आणि सिद्धू यांच्या वादात पक्ष नेतृत्वही कात्रीत सापडल्यासारखे झाले आहे. दरम्यान, प्रशांत किशोर यांनीही या संदर्भात गांधी परिवाराची भेट घेतली होती. त्यांनीही याबाबत तोडगा सुचवला आहे. परंतु, तो दोन्ही बाजूंना मान्य नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

पंजाबमधील अंतर्गत वाद विधानसभा निवडणुकीआधी पक्षाला परवडणारा नसल्याने नेतृत्वाने पावले उचलण्यास सुरवात केली आहे. सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपद मागितले होते. पक्षाने मात्र, त्यांना प्रचारप्रमुखाची जबाबदारी देण्याची तयारी दर्शविली होती. सिद्धू हे प्रदेशाध्यक्षपदावर ठाम होते. अखेर सिद्धू यांची मागणी पक्षाच्या नेतृत्वाने मान्य केल्याची चर्चा सुरू झाली होती. विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांना हटवले जाईल. सिद्धू यांच्यासोबत दोन कार्यकारी अध्यक्ष दिले जातील. यातील एक दलित आणि एक हिंदू असेल, असा तोडगा समोर आला होता. परंतु, याला कॅप्टन यांचा विरोध आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

मुख्यमंत्री अमरिंदरसिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात मागील काही दिवसांपासून वाद सुरू आहे. सिद्धू यांनी 30 जूनला प्रियांका गांधी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती.  त्यानंतर राहुल गांधी आणि सिद्धू यांची भेट झाली होती. दरम्यान, मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधींची नुकतीच भेट घेतली होती. पुढील वर्षी पंजाबमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. यामुळे त्याआधी पक्षांतर्गत वाद मिटवण्यासाठी ही भेट होती. राज्यात काँग्रेसचे नेतृत्व अमरिंदर करतील हे आधीच स्पष्ट करण्यात आले आहे. पंजाबमध्ये काँग्रेसमधील संघर्ष वाढू लागल्याने दिवसेंदिवस नेतृत्वाची डोकेदुखी वाढू लागली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com