विद्यापीठाच्या भूमिपुजन कार्यक्रमातच मोदींनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग

राज्यात सत्ताप्राप्तीत आव्हान ठरू शकणाऱ्यापक्षांवर टीका करतमोदींनी स्वपक्षीय नेत्यांना आगामी प्रचाराची दिशा दाखवल्याची चर्चा आहे.
Narendra Modi started UP election campaign at the university program
Narendra Modi started UP election campaign at the university program

नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा (Assembly Election) निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. भाजपसाठी सर्वात महत्वाचं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी एका विद्यापीठाच्या भूमिपुजन कार्यक्रमातच निवडणुकीचे रणशिंग फुंकले. शेतकरी आंदोलनाचा जोर असलेल्या जाटबहुल पश्चिम उत्तर प्रदेशात जाट राजा महेंद्रसिंह यांच्या नाव दिलेल्या विद्यापीठाचं भूमिपुजन करून मोदींनी विरोधकांना शह देण्याचा प्रयत्न केला. (Narendra Modi started UP election campaign at the university program)

भूमिपुजन कार्यक्रमात मोदींनी मंगळवारी भाजपच्या मिशन यूपी चा शंखनाद केला. एका विद्यापीठाच्या भूमीपूजनात नवीन शैक्षणिक धोरण व इतर अनेक शैक्षणिक बाबींचा उल्लेखही केला नाही. त्यामुळं ही त्यांची निवडणूक प्रचारसभा होती हा स्पष्ट आहे. राज्यात पुन्हा सत्ताप्राप्तीत आव्हान ठरू शकणारा समाजवादी पक्ष व काही प्रमाणात बसपावर टीकेची झोड उठवत मोदींनी स्वपक्षीय नेत्यांना आगामी प्रचाराची दिशा दाखवल्याची चर्चा आहे. 

मोदींनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. तसेच ते सत्तेत येण्यापूर्वीच्या उत्तर प्रदेशाच्या स्थितीवरून सपा-बसपावर निशाणा साधला. पंतप्रधान मोदी म्हणाले, पश्चिम उत्तर प्रदेशात 4-5 वर्षांपूर्वी लोक आपल्याच घरात घाबरून जगत होते. अनेक कुटुंबांना दहशतीमुळे आपलं घरदारं सोडून जावं लागलं. माता-भगिनींना घराबाहेर पडताना, शाळा-महाविद्यालयात जाता-येताना भयाचा सामना करावा लागत होता. आज योगींच्या सरकारमुळं गुंडांना असे गुन्हे करताना शंभरदा विचार करावा लागतो.

या राज्यात आधी किती मोठमोठे घोटाळे होते हे लोक हे विसरूच शकणार नाहीत. राज्याचे शासन प्रशासन गुंडांच्या व माफियांच्या मनमानीवर चालत होते. आता गुंड गजाआड झाले आहेत. योगी यांचे सरकार प्रामाणिकपणे राज्याच्या विकासासाठी समर्पित आहे. आता गरीबांचा सन्मान होतो. कोरोना काळात सर्वाधिक टीकाकरण करणारे राज्य बनल्याचेही मोदींनी सांगितले. 

पंतप्रधानांनी प्रचाराची सुरूवात करण्यासाठी निवडलेले ठिकाण व  वेळ अचूक असल्याचे मानले जाते. अलीगड मुस्लिम विद्यापीठाला समांतर असे विद्यापीठ उभारणे, त्यातून दिला जाणारा संदेश, राजा महेंद्र प्रताप सिंह अमर रहें...ही घोषणा, जाट नेते सर छोटूराम व चौधरी चरण सिंह व अजित सिंह यांचा गौरव, शेतकरी आंदोलनाचा उल्लेख न करता जाट समाजाचा, शेतकऱयांचा भाजपबद्दलचा रोष कमी करण्याचा पहिला प्रयत्न, या अनेक अंगांनी मोदी यांच्या भाषणाकडे पाहिले जात आहे.

लोकसभेत तब्बल 80 खासदार पाठविणारा उत्तर प्रदेश प्रत्येक पक्षासाठी अनेक अर्थांनी महत्वाचा आहे. त्यातही भाजपसाठी 2022 च्या सुरवातीला होणाऱया निवडणुकीत व 2024 साठीही हे राज्य राखणे अपरिहार्य आहे. त्यामुळेच मोदी-शहा यांना या राज्यातील चेहरा म्हणून योगी आदित्यनाथ यांचेच नाव नाईलाजाने का होईना स्वीकारावे लागल्याचे राजकीय तज्ज्ञांचे एकमत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com