मोदींची फर्माईश ऐकून वाराणसीकरांनी घातली तोंडात बोटे... - narendra modi says nobody is offering me momos in varanasi | Politics Marathi News - Sarkarnama

मोदींची फर्माईश ऐकून वाराणसीकरांनी घातली तोंडात बोटे...

मंगेश वैशंपायन
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'पंतप्रधान स्ट्रीट व्हेंडर स्वनिधी योजनेच्या' लाभार्थींबरोबर  व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. पदपथावरील छोटे व्यावसायिक आणि विक्रेत्यांसाठीची ही योजना आहे. 

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या सर्वाधिक फटका रस्त्यांवरील विक्रेत्यांना बसला आहे. यामुळे केंद्र सरकारने  2 जूनपासून पदपथावरील छोटे व्यावसायिक व फिरत्या विक्रेत्यांना 10 हजार रूपयांपर्यंतचे कर्ज सुलभपणे मिळण्यासाठी 'पंतप्रधान स्ट्रीट व्हेंडर स्वनिधी योजना' सुरू केली आहे. या योजनेतील लाभार्थींबरोबर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. या वेळी त्यांनी त्यांच्या वाराणसी मतदारसंघातील मतदारांकडे एक तक्रारवजा फर्माईश केली. या फर्माईशीमुळे तेथील नागरिकांना आश्चर्याचा धक्काच बसला. 

वाराणसीत पदपथावर मोमोज विकणाऱ्या एका विक्रेत्याने सांगितले की, आधार कार्डवर मला कर्ज मिळाले व लॉकडाउननंतर माझे काम पुन्हा सुरू झाले. त्यावर मोदींनी मी तेथे येतो तर मला कोणी मोमोजही विचारत नाही, असे सांगितले. मोदींच्या या तक्रारवजा फर्माईशीने सर्वच जण आश्चर्यचकित झाले. पंतप्रधान मोदी हे मागील 6 वर्षांपासून वाराणसीचे खासदार आहेत. 

आग्र्यातील एका महिलेने, लॉकडाऊनमध्ये आमचे हाल झाले असे सांगताच पंतप्रधानांनी, तेथील नगरपालिकेचे अधिकारी तुमच्याकडे येतील असा विश्‍वास दिला. काँग्रेससह विरोधकांवर टीका करताना मोदी म्हणाले की, गरीबाला कर्ज दिले तर तो ते परत करणारच नाही, अशा प्रकारचे वातावरण गरीबांच्या नावावर राजकारण करणाऱ्यांच्या काळात देशात तयार केले गेले. आमच्या देशातील गोरगरीब स्वतःचा आत्मसन्मान व प्रामाणिकपणाशी कधीही तडजोड करत नाही. सहा वर्षांपूर्वी तर गरीब लोक बॅंकेत जाण्याची कल्पनाही करू शकत नव्हते. पूर्वी कर्जासाठी लोकांना बँकांच्या चकरा माराव्या लागत. आता बँकाच लोकांकडे येत आहेत. 

कोरोनाच्या संकटामुळे बड्या अर्थसत्तांनी गुडघे टेकले. मात्र, भारतातील सामान्य माणसाने जिद्दीने लढाई सुरू ठेवली. कोरोनाला पूर्णपणे हरविण्यात सामान्य भारतीयाचा वाटा सर्वाधिक असेल. या योजनेत वेळेत हप्ते भरले तर व्याजावर 7 टक्के सवलत मिळते व डिजिटल व्यवहार करणाऱ्यांना 100 रूपये कॅशबॅकचा बोनसही मिळतो. कर्ज घेताना कागदपत्रे नाहीत, जामीनदार नाही, दलाल नाही व सरकारी कार्यालयांते उंबरठे झिजवणेही नाही, असे मोदी यांनी सांगितले.  

या योजनेमागे सबका साथ, सबका विकास, सबका विश्‍वास हीच कल्पना आहे. कोणत्याही राज्याच्या अर्थकारणाचे चक्र फिरते ठेवण्यात रस्त्यावरील फिरत्या विक्रेत्यांचा मोठा वाटा असतो. उत्तर प्रदेशात या योजनेचे सर्वाधिक 7 लाखांहून जास्त लाभार्थी आहेत त्यातील 3 लाख 70 हजारांना कर्ज मिळाले आहे, असे मोदींनी नमूद केले. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख