मोदींनी 'बिहारच्या पुत्रा'च्या आठवणी जागवल्याने राजकीय चर्चांना उधाण - narendra modi pays respect to ram vilas paswan at bihar election rally | Politics Marathi News - Sarkarnama

मोदींनी 'बिहारच्या पुत्रा'च्या आठवणी जागवल्याने राजकीय चर्चांना उधाण

वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020

बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा जोर वाढला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता बिहारच्या प्रचारात थेट उतरले आहेत.  

नवी दिल्ली : बिहारमध्ये प्रचाराला आता जोर चढला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट प्रचारात उडी घेतली आहे. मोदींना आज जाहीर सभेत बोलताना बिहारच्या दोन पुत्रांच्या आठवणी जागवून जनभावनेला हात घातला. यात पंतप्रधानांचे दिवंगत सहकारी रामविलास पासवान आणि बाबू रघुवंशसिंह प्रसाद यांचा समावेश होता. राष्ट्रीय लोकशाही आघाडीपासून (एनडीए) पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाने (एलजेपी) फारकत घेऊनही मोदींनी पासवान यांचा उल्लेख केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

मुख्यमंत्री नितीशकुमार यांना विरोध करीत बिहारमधील सत्ताधारी एनडीएतून एलजेपी बाहेर पडला आहे. याचवेळी देश पातळीवर भाजपला पाठिंबा कायम राहील, अशी भूमिका एलजेपीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी घेतली आहे. चिराग यांनी हे नितीशकुमार यांना लक्ष्य करीत आहेत. तरुणांच्या हाती सूत्रे मिळावीत अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. 

मोदींना आज बिहारमधील प्रचारात उडी घेतली. त्यांनी आज सासाराम, गया आणि भागलपूर येथे जाहीर सभा घेतल्या. या वेळी त्यांनी राज्यातील एनडीए सरकारचे कौतुक केले. मोदींनी काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाला लक्ष्य केले. मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहार विकासाच्या मार्गावर वाटचाल करीत आहेत, असा दावा मोदींनी केला. 

मोदींनी आज भाषणात बिहारच्या दोन पुत्रांचा उल्लेख केला. यामुळे राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मोदी म्हणाले की, बिहारने नुकतेच दोन पुत्र गमावले आहेत. मी रामविलास पासवान यांना आदरांजली अर्पण करतो. ते शेवटच्या श्वासापर्यंत माझ्यासोबत होते. त्यांनी संपूर्ण आयुष्य गरीब आणि दलितांच्या कल्याणासाठी वाहिले. याचप्रकारे बाबू रघुवंशप्रसादसिंह यांनी गरीबांसाठी काम केले. मी त्यांनाही आदरांजली वाहतो. 

मोदींना आज पासवान यांचा उल्लेख केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. चिराग पासवान हे एनडीएमधून बाहेर पडले असले तरी ते मोदींचे गुणगाण गाताना थकत नसल्याचे चित्र आहे. याचवेळी मोदींनीही चिराग यांचे पिता रामविलास पासवान यांच्या आठवणी जागवल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहे. पासवान यांच्या निधनानंतर जनतेत असलेल्या सहानुभूतीच्या लाटेचा फायदा व्हावा, हा उद्देश यामागे असल्याची चर्चा आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक भाजप नेत्यांनी एलजेपीमध्ये प्रवेश केला आहे. यातील बहुतांश नेत्यांचे मतदारसंघ हे जागावाटपात संयुक्त जनता दलाकडे (जेडीयू) गेले आहेत. भाजप नेते पक्षांतर करीत असताना भाजप नेतृत्व याकडे काहीच घडत नसल्याप्रमाणे पाहत होते. तसेच, यावर काही प्रतिक्रियाही देताना दिसत नव्हते. नितीशकुमार हेच मुख्यमंत्री असतील, असे भाजप म्हणत आहे. भाजपकडून संयुक्त जनता दलाच्या (जेडीयू) विरोधात राजकारण सुरू आहे, अशी चर्चा सुरू आहे.  

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख