'मेड इन इंडिया' लस एकच अन् मोदी म्हणाले, दोन!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेशी संवाद साधताना दोन मेड इन इंडिया कोरोना लशी उपलब्ध असल्याचे म्हटले आहे.
narendra modi mentions two made in india vaccines in speech
narendra modi mentions two made in india vaccines in speech

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देशातील जनतेशी संवाद साधताना दोन मेड इन इंडिया (Made In India) कोरोना लशी (Covid Vaccine) उपलब्ध असल्याचे म्हटले आहे. प्रत्यक्षात देशात सध्या भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही एकच मेड इन इंडिया लस उपलब्ध आहे. असे असतानाही मोदींनी दोन मेड इन इंडिया लशींचा उल्लेख कसा केला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

देशातील कोरोनाची दुसरी लाट आणि कोरोना लसीकरण या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी आज जनतेशी संवाद साधला. या वेळी मोदींनी देशातील कोरोना लसीकरणाचा आढावा घेतला. ते म्हणाले की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांनी कुटुंबीय आणि परिचित गमावले. त्या  सर्वांच्या दु:खात मी सहभागी आहे. कोरोना शंभर वर्षांतील सर्वांत मोठी महामारी आहे. या महामारीशी आपला देश अनेक पातळ्यांवर लढला. आपण दोन मेड इन इंडिया कोरोना लशी विकसित केल्या आहेत. भारतात लस बनली नसती तर काय झाले असते हा विचारही करवत नाही. मागील 50 ते 60 वर्षांचा इतिहास पाहता आपल्याला लस मिळायला दशक लागायचे. आतापर्यंत देशात कोरोना लशीचे 23 कोटी डोस देण्यात आले आहेत.

मोदींनी मेड इन इंडिया दोन लशींचा उल्लेख केला आहे. प्रत्यक्षात देशात वापरात असलेली भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही एकमेव लस मेड इन इंडिया आहे. सिरम उत्पादित करीत असलेली कोव्हिशिल्ड ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेनेका कंपनीने विकसित केली आहे. देशात तिसरी लस स्पुटनिक व्ही असून, ती रशियातील आहे. यामुळे पंतप्रधान मोदींना दुसरी मेड इन इंडिया लस कुठली शोधली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

याचबरोबर मोदींनी नेजल लशीचाही उल्लेख केला. ही लस प्रत्यक्षात आल्यास देशातील लसीकरण अधिक वेगाने होईल, असा दावाही मोदींनी केला. प्रत्यक्षात सिरमकडून नेजल लस विकसित केली जात आहे. अमेरिकेतील नोव्हाव्हॅक्स या कंपनीशी सिरमने यासाठी भागीदारी केली आहे. यामुळे ही लस यशस्वी ठरली तरी ती किती प्रमाणात भारताला मिळेल, याबद्दलही प्रश्न उपस्थित आहे. 

सध्या देशात कोरोना लसीकरणाचा चौथा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस दिली जात आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात 1एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना ही लस दिली जात आहे. जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास भारतात 16 जानेवारीला सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले होते. परंतु, आता लस नसल्याने अनेक लसीकरण केंद्रे बंद पडली आहेत. 

सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. यातील पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश होता. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ही लस 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आली. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील व्यक्तींनाही लस दिली गेली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in