भाजपमध्ये बंडखोरीची चिन्हे दिसताच मोदींनी विश्वासू ए.के.शर्मांकडे सोपवलं उपाध्यक्षपद - narendra modi close aid a k sharma appointed as bjp vice president | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

भाजपमध्ये बंडखोरीची चिन्हे दिसताच मोदींनी विश्वासू ए.के.शर्मांकडे सोपवलं उपाध्यक्षपद

वृत्तसंस्था
शनिवार, 19 जून 2021

भाजपमध्ये बंडाची चिन्हे दिसू लागताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचे विश्वासू माजी सनदी अधिकारी ए.के.शर्मा यांच्यावर पक्षाच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे.

नवी दिल्ली :  उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) आगामी वर्षात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी (Assembly Election) भाजपने आताच पावले उचलण्यास सुरवात केली आहे.  मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्याबद्दल पक्षात नाराजी वाढत आहे. भाजपमध्ये बंडाची चिन्हे दिसू लागताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) त्यांचे निकटवर्ती व विश्वासू माजी सनदी अधिकारी ए.के.शर्मा (A.K.Sharma) यांच्यावर राज्यात पक्षाच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे कोरोना संकट हाताळण्यात अपयशी ठरल्याची टीका होत आहे. याचबरोबर सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात अंतर्गत वाद आहेत. अनेक नेते उघडपणे योगींच्या विरोधात बोलू लागले आहेत. पक्षात दिवसेंदिवस वाद वाढत आहेत. यातच कोरोना संकट हाताळण्यातील चुकांमुळे जनतेत नाराजी आहे. त्यामुळे पक्ष नेतृत्वाने ही बाब गंभीरपणे घेतली आहे. देशातील सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो. त्यामुळे उत्तर प्रदेशात पुढील वर्षी होणारी विधानसभा निवडणूक 2024 मधील केंद्र सरकार कुणाचे असेल, हे दर्शविणारी असेल. 

मोदींचे विश्वासू ए.के.शर्मा यांच्यावर उत्तर प्रदेशात मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्यावर पक्षाच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी महत्वाचे निर्णय घेण्याचे अधिकारही शर्मांकडे सोपवले जातील, असे समजते. मोदींनीच आता उत्तर प्रदेशात थेट लक्ष घातल्याचे हे निदर्शक आहे. त्यांच्या निकटवर्तीयाला उत्तर प्रदेशात पाठवून त्यांनी राज्यातील सर्व सूत्रे हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले. 

हेही वाचा : तीन कॅबिनेट, राष्ट्रीय सरचिटणीस अन् पक्ष प्रभारीपदाच्या ऑफरवरही पायलट मानेनात 

पुढील वर्षी उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुका होत असून, राज्यातील जनतेत सरकारबद्दल असलेल्या नाराजीची दखल पक्ष नेतृत्वाने घेतली आहे. यामुळे योगी आदित्यनाथ यांच्या जागी मुख्यमंत्रिपदी नवीन चेहरा येईल, अशी चर्चा होती. परंतु, योगींना बदलण्यास पक्षाने नकार दिला आहे. याचबरोबर प्रदेशाध्यक्ष स्वतंत्रदेव सिंह यांनाही बदलण्यात येणार नाही. या ऐवजी मंत्रिमंडळात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळात काही नवीन चेहरे येतील. उत्तर प्रदेशातील जातीय समीकरणे समोर ठेवून त्यांची निवड होईल, असे सूत्रांनी सांगितले. 

उत्तर प्रदेशमध्ये आगामी वर्षात होणाऱ्या विधानसभा निवडणुका हा संघपरिवाराने राजकीयदृष्ट्या प्राधान्यक्रमावरील विषय ठेवला आहे. या दृष्टीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह दत्तात्रय होसबळे आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये नुकतीच महत्वाची ऑनलाइन बैठक झाली होती. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते परंतु, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची अनुपस्थिती होती. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख