कायम विरोधात असलेले मोदी-शहा अन् सोनिया गांधी आले एकत्र

संसदेचे पावसाळी अधिवेशन विरोधकांच्या गोंधळानेच गाजले.
Narendra Modi Amit Shah Sonia Gandhi met Om Birla
Narendra Modi Amit Shah Sonia Gandhi met Om Birla

नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन विरोधकांच्या गोंधळानेच गाजले. या गोंधळातच बुधवारी लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले. वास्तविक 13 ऑगस्टपर्यंत हे कामकाज चालणार होते. एक दिवसही पूर्णवेळ कामकाज होऊ न शकले नाही. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी बुधवारी कामकाज स्थगित करण्याची घोषणा केली. (Narendra Modi, Amit Shah and Sonia Gandhi met Om Birla)

लोकसभेचे कामकाज स्थगित होताच बिर्ला यांनी सत्ताधारी व विरोधकांची बैठक बोलावली. या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, खासदार अधिर रंजन चौधरी यांच्यासह तृणमूल काँग्रेस, शिरोमणी अकाली दल, बीजेडी यांसह विविध पक्षांचे नेते बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत लोकसभेच्या कामकाजाबाबत चर्चा झाल्याचे समजते. 

अधिवेशनच्या आदल्यादिवशीच पेगॅसस प्रकरण बाहेर आल्याने केंद्र सरकारची डोकेदुखी वाढली. काँग्रेससह सर्वच विरोधकांनी त्यावरून सरकारला धारेवर धरलं. त्यामुळं अधिवेशन काळात एकही दिवस गोंधळाशिवाय गेला नाही. विरोधकांनी पेगॅससच्या मुद्यावर संसदेत चर्चा करण्याची मागणी केली. पण सरकारकडून त्यास नकार देण्यात आल्यानं गोंधळ अधिकच वाढत गेला. 

त्यातच केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू झालं. विरोधकांनी हा मुद्दाही उचलून धरत तीन कायदे रद्द करण्याची मागणी केली. त्यामुळं सरकारच्या अडचणीत वाढ झाली. पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांच्या या भूमिकेवर जोरदार प्रहारही केला. पण त्यानंतरही विरोधाची धार कमी झाली नाही. त्यामुळे सातत्याने कामकाज स्थगित करावं लागलं. परिणामी, 127 व्या घटनादुरूस्तीचे विधेयक वगळता एकाही विधेयकावर चर्चा न करता ती संमत करण्यात आली. 

यापार्श्वभूमीवर बिर्ला यांनी बुधवारी बोलावलेल्या बैठकीला पंतप्रधानांसह शहा व सोनिया गांधी प्रमुख नेत्यांची उपस्थिती महत्वाची ठरली. राज्यसभेच्या कामकाजादरम्यानही बराच गोंधळ पाहायला मिळाला. तृणमूल खासदाने माहिती व तंत्रज्ञान मंत्र्यांच्या हातातील कागद हिसकावून घेत ते फाडल्याने त्यांचे निलंबन करण्यात आले. तर मंगळवारी दोन खासदार बाकांवर उभे राहिल्याने नायडू यांनी बुधवारी कामकाज सुरू होताच तीव्र नाराजी व्यक्त केली. आपल्या भावना व्यक्त करताना त्यांना अश्रू आवरता आले नाहीत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com