मोदींचे धक्कातंत्र : कोरोनाच्या बैठका आटोपल्या अन् लगेचच बंगालच्या प्रचारात 'हजर'

देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढला आहे. मागील 24 तासांत 2 हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तरीही पश्चिम बंगालमध्ये प्रचाराचा जोर कायम आहे.
narendra modi addresses rally in west bengal via video conferencing
narendra modi addresses rally in west bengal via video conferencing

नवी दिल्ली : सध्या पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढला असला तरी बंगालमध्ये भाजपकडून जोरदार प्रचार सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज दिवसभर उपाययोजनांसाठी नियोजित बैठका असल्याने बंगालमध्ये प्रचारासाठी जाणे रद्द केले होते. यामुळे मोदींनी बंगालच्या प्रचारातून काढता पाय घेतल्याची चर्चा सुरू होती. परंतु, उच्चस्तरीय बैठका संपताच व्हर्च्युअल माध्यमातून बंगालच्या प्रचारात मोदी पुन्हा हजर झाले आहेत. 

पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात विधानसभा निवडणूक होत आहे. या निवडणुकीत सत्ताधारी तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप असे चित्र आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निवडणूक एकाच टप्प्यात घ्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली होती. परंतु, भाजपने निवडणुकीमुळे कोरोना पसरत नाही, असे सांगत पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार निवडणूक घ्यावी, अशी मागणी निवडणूक आयोगासमोर घेतली होती. बंगालमध्ये आता कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. 

देशातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत असताना अनेक उच्च न्यायालये आणि  खुद्द सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने कोरोनाविषयक उपाययोजनांचा आराखडा सादर करण्याचे निर्देशही केंद्र सरकारला दिले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी बंगालमध्ये प्रचारासाठी जाणार नसल्याचे काल जाहीर केले होते. 

मी देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठक घेत आहे. यामुळे मी पश्चिम बंगालला जाऊ शकणार नाही, असे मोदींना काल ट्विटरवर म्हटले होते. यामुळे मोदींनी बंगालच्या प्रचारातून काढता पाय घेतल्याची चर्चा सुरू झाली होती. आज उच्चस्तरीय बैठका संपल्यानंतर मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बंगालचा प्रचारात हजेरी लावून सगळ्यांनाच धक्का दिला. त्यांनी सुरू, मालदा, बेहरामपूर आणि भवानीपूर येथील सभांना व्हर्च्युअल हजेरी लावली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, देशातील कोरोना स्थिती गंभीर आहे. त्यामुळे मी सकाळपासून बैठकांमध्ये गुंतलो होते. आता मी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तुमच्याशी जोडलो गेलो आहे.  

रुग्णसंख्या वाढीचा वेग चिंताजनक 
देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढला आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 3 लाख 32 हजार नवीन रुग्ण सापडले असून, 2 हजार 263 जणांचा मृत्यू झाला आहे. जगातील कोणत्याही देशात आतापर्यंत एका दिवसांत नोंदवण्यात आले नाहीत तेवढे रुग्ण भारताने सलग दोन दिवस नोंदवले आहेत. यामुळे देशातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे चित्र आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com