narcotics control bureau officer found covid19 positive | Sarkarnama

एनसीबीच्या तपासात कोरोनाचे विघ्न; अधिकारीच सापडला पॉझिटिव्ह

वृत्तसंस्था
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील ड्रग्जच्या अँगलचा तपास एनसीबी करीत आहे. आता एनसीबीच्या तपासाला आणखी वेळ लागण्याची चिन्हे आहेत. 

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्जच्या अँगलचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिला अटक केली आहे. आज एनसीबीच्या एका अधिकाऱ्यालाच कोरोना झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामुळे एनसीबीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. इतर अधिकाऱ्यांचीही कोरोना चाचणी करण्याचे फर्मान काढण्यात आले आहे. यामुळे एनसीबीच्या तपासात कोरोनाचे विघ्न आता निर्माण झाले आहे. 

'एनसीबी'कडून रिया आणि तिचा भाऊ शौविक यांची चौकशी झाली होती. ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या बॉलीवूडमधील काही कलाकारांची नावे या दोघांनी उघड केली आहेत. बॉलीवूडमधील पार्ट्या आणि ड्रग्जची तस्करी यावरही या दोघांनी प्रकाश पाडला आहे. एनसीबीकडून काही कलाकारांना या प्रकरणी चौकशीसाठी या आठवड्यात बोलावण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

रियावर अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (एनडीपीएस) कलम 8 (सी), 20 (बी), 28 आणि 29 नुसार ड्रग्जचे खरेदी, सेवन, बाळगणे आदी आरोप तिच्यावर ठेवण्यात आले आहेत. रिया ही ड्रग्ज रॅकेटची सक्रिय सदस्य असून, तिने अमली पदार्थांचे सेवन केले आहे आणि ती यातील आर्थिक व्यवहारांमध्येही सहभागी होता, असे एनसीबीने न्यायालयाला सांगितले होते.  

रिया चक्रवर्तीच्या चौकशीत तिने बॉलीवूडमधील कलाकारांची नावे उघड केली आहेत. यात अभिनेत्री सारा अली खान, राकुल प्रीत सिंग आणि फॅशन डिझायनर सिमॉन खंबाटा यांची नावे आहेत. त्यांना या आठवड्याच्या अखेरीस चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे. याचबरोबर अनेक इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या आणि इव्हेंट मॅनेजरही एनसीबीच्या रडारवर आले आहेत. बॉलीवूडमधील ड्रग्ज रॅकेटची पाळेमुळे खणून काढण्याच्या दिशेने एनसीबी पावले टाकत आहे. 

सुशांतची माजी व्यवस्थापिका श्रुती मोदी हिची आज चौकशी होणार होती. मात्र, चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. यानंतर चौकशी रद्द करण्यात आली. एनसीबीचे उपसंचालक के.पी.एस. मल्होत्रा यांनी म्हटले आहे की, आमच्या पथकातील एका अधिकाऱ्याची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. या चाचणीचा अहवाल आताच आमच्या हाती आला आहे. पथकातील इतर अधिकाऱ्यांचीही चाचणी करण्यात येणार आहे. याचबरोबर कोरोनाविषयक सर्व उपाययोजना आम्ही करीत आहोत. 

सुशांतच्या घरी काम करणाऱ्या दीपेश सावंत याला एनसीबीने आधी अटक केली होती. दीपेश हा ड्रग्जची खरेदी आणि हाताळणी करीत होता. तो सुशांतला ड्रग्ज आणून देत होता. 'एनसीबी'ने या प्रकरणात सुरुवातीला कायझेन इब्राहिम, झैद विलाट्रा, अब्बास लखानी, अब्दुल बसित परिहार यांना अटक केली आहे. हे सर्वजण ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागी होते. त्यांच्याकडून अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचा भाऊ शौविक आणि सुशांतचा मॅनेजर सॅम्युएल मिरांडा हे ड्रग्ज खरेदी करीत होते. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती. 

सुशांत हा 14 जूनला मुंबईतील घरी मृतावस्थेत सापडला होता. याचा तपास मुंबई पोलिस करीत होते. या प्रकरणी पोलिसांनी 56 जणांचे जबाब नोंदविले होते. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा समावेश होता. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख