महाराष्ट्रातील डझनभर खासदार दिल्लीत दाखल पण राणे, पाटील अन् पवारांनाच संधी? - narayan rane kapil patil and bharti pawar may be inducted in union cabinet | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

महाराष्ट्रातील डझनभर खासदार दिल्लीत दाखल पण राणे, पाटील अन् पवारांनाच संधी?

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 7 जुलै 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून केंद्रीय मंत्रिमंडळाचा मेगाविस्तार आज सायंकाळी 6 वाजता होणार आहे. 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडून केंद्रीय मंत्रिमंडळाचा (Union Cabinet) मेगाविस्तार आज सायंकाळी 6 वाजता होणार आहे. या विस्तारासाठी महाराष्ट्रातील भाजपचे सुमारे डझनभर खासदार दिल्लीत दाखल झाले आहेत. यातील नारायण राणे (Narayan Rane), भारती पवार (Bharati Pawar) आणि कपिल पाटील (Kapil Patil) या भाजप नेत्यांच्या नावावर  मंत्रिपदासाठी शिक्कामोर्तब झाले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी मंत्रिमंडळ विस्तारासाठी बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यासह अनेक नेते उपस्थित आहेत. मंत्रिमंडळ विस्तार आणि फेररचनेत सुमारे 43 मंत्री आज शपथ घेतील. पंतप्रधान मोदींच्या दुसऱ्या टर्ममधील हा पहिलाच मंत्रिमंडळ विस्तार असणार आहे. रामविलास पासवान आणि सुरेश अंगडी यांचे निधन आणि शिवसेना व अकाली दल बाहेर पडल्याने मंत्रिमंडळातील रिक्त जागा वाढल्या आहेत. 

मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रातील सुमारे डझनभर खासदार दिल्लीत दाखल झाले आहेत. यामुळे महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्रिमंडळात कुणाचा समावेश होणार याबद्दल मोठे तर्कवितर्क लढवले जात आहेत. अखेर नारायण राणे, कपिल पाटील आणि भारती पवार यांचा मंत्रिमंडळातील समावेश निश्चित मानला जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे नाव आघाडीवर आहे. मराठा आरक्षण प्रश्नामुळे राणेंसारख्या मराठा चेहऱ्याला संधी दिली जाईल, असे मानले जात आहे. याचबरोबर पालघरमधील भाजप नेते कपिल पाटील यांचाही समावेश होईल. पालघर, ठाण्यात शिवसेनेला उत्तर देण्यासाठी पाटील यांना बळ दिले जाईल. नाशिकच्या खासदार भारती पवार यांनाही स्थान दिले जाईल. उत्तर महाराष्ट्रात भाजपची ताकद वाढवण्यासाठी त्यांनी मंत्रिपद दिले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

हेही वाचा : रावसाहेब दानवे, संजय धोत्रे यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता 

राज्यातून सध्या नितीन गडकरी, पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर हे तीन कॅबिनेट मंत्री आहेत. रावसाहेब दानवे, संजय धोत्रे आणि रामदास आठवले हे तीन राज्यमंत्री होते परंतु, यातील दानवे आणि धोत्रे यांची गच्छंती झाली आहे. शिवसेनेचे अरविंद सावंतदेखील कॅबिनेट मंत्री होते, पण महाराष्ट्रातील सत्तांतर नाट्यानंतर सावंत यांना पक्षाच्या आदेशनांतर  मंत्रिपद सोडावे लागले होते. 

केंद्रीय मंत्रिमंडळात 81 मंत्री असू शकतात परंतु, सध्या ही संख्या 53 आहे. यामुळे 28 नवीन सदस्यांचा समावेश होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मंत्रिमंडळ विस्ताराविषयी मंत्रिमंडळातील सदस्यांना गटाने बोलावून त्यांच्याशी चर्चाही केली होती. विस्तारात प्रादेशिक आणि जातीय समतोल राखला जाणार आहे. याचबरोबर पाच राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकात डोळ्यामसोर ठेवून विस्तार केला जाईल. तसेच, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक या मोठ्या राज्यांना जादा प्रतिनिधित्व दिले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख