राणेंनी मोडला रेकॉर्ड...20 वर्षांत प्रथमच केंद्रीय मंत्र्याला अटक
narayan rane is first union minister arrested in 20 years

राणेंनी मोडला रेकॉर्ड...20 वर्षांत प्रथमच केंद्रीय मंत्र्याला अटक

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना सुरू झाला आहे.

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन शिवसेना (Shivsena) विरुद्ध भाजप (BJP) असा सामना सुरू झाला आहे. अखेर राणेंना पोलिसांनी अटक केली आहे. राणेंच्या अटकेनंतर त्यांनी रेकॉर्ड नोंदवला आहे. मागील तब्बल 20 वर्षांत अटक झालेले ते पहिले केंद्रीय मंत्री ठरले आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्याला अटक होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामुळे भाजपवर नामुष्की ओढवली आहे. राणे यांनी 7 जुलैला केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यांच्याकडे लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योग खाते देण्यात आले होते. राणेंना अटक झाल्याने ते 20 वर्षांत अटकेची कारवाई झालेले पहिले केंद्रीय मंत्री ठरले आहेत. त्यामुळे राणेंच्या अटकेने एक नवा विक्रम नोंदवला गेला आहे. 

राणेंना अटक करण्यासाठी अनेक ठिकाणच्या पोलिसांनी कारवाई सुरू केल्यानंतर त्यांनी रत्नागिरीतील न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने राणेंना जामीन देण्यास नकार दिला होता. तांत्रिक मुद्द्यावर हा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. नाशिकमध्ये गुन्हा दाखल असताना रत्नागिरीत जामीन अर्ज का, या मुद्द्यावर हा अर्ज फेटाळण्यात आला. यानंतर राणेंच्या वतीने उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्जासाठी अर्ज करण्यात आला होता. परंतु, उच्च न्यायालयाने यावर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. यामुळे राणेंना अटक होणार हे स्पष्ट झाले होते. 

न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळताच त्यांना ताब्यात घेण्यासाठी संगमेश्वरमधील गोळवली गावात पोलीस दाखल झाले होते. पोलिसांनी राणेंना ताब्यात घेतले. त्यांच्या अटकेची कारवाई पोलिसांनी केली. राणेंची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी डॉक्टरांचे पथकही दाखल झाले होते. वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर राणेंना अटक करुन पोलीस घेऊन घेले होते. 

आत्तापर्यंत राणेंवर चार ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांच्या अटकेचे आदेश देण्यात आले आहेत. महाड, रायगड, नाशिक आणि पुण्यात नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. औरंगाबादमध्येही गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मुख्यमंत्र्यांविषयी बदनामीकारक वक्तव्य करणे आणि शत्रूभाव निर्माण करण्यासाठीच्या कलमांचा समावेश आहे. नाशिक सायबर पोलीस स्टेशनमध्ये नारायण राणे यांच्याविरोधात कलम 500, 505 (2), 153-ब (1) (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर महाडमध्ये भादंवि कलम 153, 189, 504, 505 (2) आणि 506 प्रमाणे नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in