चौकशी पूर्ण होण्याआधीच कंगना अन् तिची बहीण निघून गेली; मुंबई पोलिसांचा दावा

अभिनेत्री कंगना राणावतसह तिच्या बहिणीवर देशद्रोहाचा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांकडून त्यांची चौकशी सुरू आहे.
mumbai police says kangana ranaut left before completion of interrogation
mumbai police says kangana ranaut left before completion of interrogation

मुंबई : वादग्रस्त वक्तव्ये केल्याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी अभिनेत्री कंगना राणावत आणि तिची बहीण रंगोली चंडोली यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणी कंगना आणि रंगोली यांना 25 जानेवारीपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे. या कालावधीत दोघींना चौकशीसाठी बोलावू नये, असे निर्देशही न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. दरम्यान, मागील वेळी चौकशी पूर्ण होण्याआधीच कंगना आणि रंगोली या निघून गेल्याचा दावा पोलिसांनी न्यायालयात आज केला. 

कंगनाने दोन समाजात तेढ पसरवणारे वक्तव्य केल्याप्रकरणी तिच्याविरुद्ध वांद्य्रातील महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली होती. यावर न्यायालयाने कंगना आणि तिची बहीण रंगोली चंडेल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन तपास करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले होते. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार वांद्रे पोलिसांनी कंगना आणि रंगोली यांच्याविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. यात देशद्रोहाचा गुन्हाही त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. कंगना आणि रंगोली यांना मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजावली होती. मात्र, त्यांनी चौकशीसाठी हजर राहण्यास टाळाटाळ केली होती. 

या प्रकरणी कंगना आणि रंगोली या दोघी वांद्रे पोलीस ठाण्यात 8 जानेवारीला चौकशीसाठी हजर झाल्या होत्या. त्यांची तीन तास चौकशी करण्यात आली होती. कंगनाने केलेल्या वादग्रस्त ट्विटप्रकरणी पोलीस तिची चौकशी करीत आहेत.

कंगना आणि रंगोलीने या प्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर उच्च न्यायालयाने हा गुन्हा रद्द करण्यास नकार दिला होता. कंगना आणि रंगोलीने तीन वेळा समन्स बजावूनही चौकशीसाठी हजेरी लावली नाही याबद्दल न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. या प्रकरणी न्यायालयात आज पुढील सुनावणी झाली. कंगना आणि तिच्या बहिणीली अटकेपासून दिलेले संरक्षण न्यायालयाने 25 जानेवारीपर्यंत वाढवले आहे. याचबरोबर या कालावधीत दोघींना चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी बोलावू नये, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. 

या वेळी सरकारी वकील दीपक ठाकरे यांनी न्यायालयाला सांगितले की, कंगना आणि तिची बहीण 8 जानेवारीला दुपारी 1 ते 3 या वेळेत चौकशीसाठी हजर होत्या. परंतु, चौकशी पूर्ण होण्याआधीच त्या निघून गेल्या. काम असल्याचे सांगून त्या गेल्या होत्या. त्यांना आम्हाला पुन्हा चौकशीसाठी बोलवायचे आहे. त्यांनी सहकार्य करण्यात चुकीचे काय आहे. 

कंगना दोन तास चौकशीसाठी होती तर तेवढा वेळ पुरेसा नाही का? पोलिसांना आणखी किती तास सहकार्याची आवश्यकता आहे, असा सवाल यावर न्यायालयाने केला. या प्रकरणी पुढील सुनावणी 25 जानेवारीला होणार आहे. 

कंगनाने मुंबईबद्दल वादग्रस्त वक्तव्य करुन वाद ओढवून घेतला होता. यामुळे कंगना आणि शिवसेना यांच्यात जोरदार सामना रंगला होता. यात कंगनाच्या बाजूने भाजप नेते मैदानात उतरले होते. तिने थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. तिने राज्यपालांसमोर गाऱ्हाणे मांडून, न्याय देण्याची मागणी केली होती. त्यानंतर कंगना मुंबई सोडून हिमाचल प्रदेशमधील तिच्या घरी परतली होती. तेथूनही तिने ट्विटरवर वादग्रस्त वक्तव्यांची मालिका कायम ठेवली होती. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com