रिपब्लिक टीव्ही अन् अर्णब गोस्वामींकडून मुंबई पोलिसांवर उगवला जातोय सूड! - mumbai police files affidavit in trp scam against republic tv and arnab goswami | Politics Marathi News - Sarkarnama

रिपब्लिक टीव्ही अन् अर्णब गोस्वामींकडून मुंबई पोलिसांवर उगवला जातोय सूड!

वृत्तसंस्था
शनिवार, 30 जानेवारी 2021

बनावट टीआरपी प्रकरणात अर्णब गोस्वामी अडचणीत आले आहेत. या प्रकरणातील साक्षीदारांवर ते दबाव आणत असल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला आहे. 

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी हे बनावट टीआरपी प्रकरणात अडचणीत आले आहेत. गोस्वामी हे या प्रकरणात त्यांच्या रिपब्लिक टीव्ही या वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमांच्या माध्यमातून मुंबई पोलिसांवर सूड उगवत आहेत. याचबरोबर ते या प्रकरणातील साक्षीदारांवर दबाव आणून प्रत्यक्षपणे तपासात हस्तक्षेप करीत आहेत, असा दावा मुंबई पोलिसांनी उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात केला आहे. यामुळे गोस्वामींच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. 

बनावट टीआरपी प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी अडचणीत आले आहेत. या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीच्या काही अधिकाऱ्यांना अटक झाली असून, चौकशीचा फेरा सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलचे (बीएआरसी) माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली होती. गोस्वामी हे रिपब्लिक टीव्हीचा टीआरपी वाढवण्यासाठी दासगुप्ता यांना लाखो रुपये देत असल्याची खळबळजनक बाब तपासात समोर आली होती. 

अर्णब गोस्वामींना लक्ष्य करणं नाविका कुमार यांना पडणार महागात

उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एस.एस.शिंदे आणि मनीष पितळे यांच्या खंडपीठासमोर मुंबई पोलिसांनी हे प्रतिज्ञापत्र नुकतेच सादर केले आहे. रिपब्लिक टीव्हीची पालक कंपनी 'एआरजी'ने टीआरपी प्रकरणातील एफआयआर रद्द करावी, अशी याचिका उच्च न्यायालयात केली आहे. मुंबई पोलिसांनी खोट्या प्रकरणात आपल्या कर्मचाऱ्यांना अडकवले, असा आरोपही या याचिकेत करण्यात आला आहे. यावर मुंबई पोलिसांनी प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. 

मुंबई पोलिसांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, या प्रकरणाच्या तपासात बीएआरसीच्या अधिकाऱ्यांनी इतरांसोबत संगनमत करुन टीआरपी वाढवल्याचे निष्पन्न झाले आहे. एआरजीच्या मालकीच्या वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून यातील आरोपींना क्लिनचिट देण्यात येत आहे. याचवेळी मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्यांना बदनाम करण्यात येत आहे. या प्रकरणाची मीडिया ट्रायल या वृत्तवाहिन्यांवर सुरू आहे. अशा प्रकारची मीडिया ट्रायल अवैध असून, मुक्त आणि निष्पक्ष तपासाच्या प्रक्रियेवर परिणाम होत आहे.  

गोस्वामी आणि दासगुप्ता यांच्यातील वादग्रस्त चॅट मुंबई पोलिसांनी न्यायालयात सादर केले आहे. यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात गोस्वामी यांनी पंतप्रधान कार्यालय आणि माहिती व प्रसारण मंत्रालयचा वापर व्यवसायाच्या वाढीसाठी केल्याचे समोर आले आहे. गोस्वामी यांनी पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि माहिती व प्रसारण मंत्रालयातील स्वत:च्या वजनाचा अभिमानाने उल्लेख केला होता. 

Edited by Sanjay Jadhav
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख