कोरोनाचा संसर्गामुळे बुलेट ट्रेनला लागला 'ब्रेक'

कोरोनाच्या प्रादुर्भावाचा फटका देशाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. आता कोरोनाच्या संसर्गामुळे बुलेट ट्रेनच्या मार्गातही अनेक अडसर येत आहेत.या प्रकल्पाला पाच वर्षांचा विलंब लागण्याची शक्यता आहे.
mumbai to ahmedabad bullet train project will face 5 year delay
mumbai to ahmedabad bullet train project will face 5 year delay

नवी दिल्ली :  कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे व्यापार व उद्योग ठप्प झाले. देशाच्या अर्थव्यवस्थेने तळ गाठला आहे. सरकारच्या महसुली संकलनालाही मोठा फटका बसला असून, साहजिकच याचा परिणाम पायाभूत सुविधा प्रकल्पांवरही होत आहे. मोदी सरकारचा महत्वाकांक्षी मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला कोरोनाच्या संसर्गामुळे ब्रेक लागला आहे. या प्रकल्पाला पाच वर्षांचा विलंब लागण्याची शक्यता आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी निविदा काढणे आणि भूसंपादनाला विलंब होणार आहे. यामुळे प्रकल्पाची निर्धारित करण्यात आलेली २०२३ ची डेडलाईन चुकण्याची शक्यता अधिक आहे. राष्ट्रीय उच्चवेग रेल्वे महामंडळाने (एनएचएसआरसीएल)  या प्रकल्पासाठी या आतापर्यंत ६३ टक्के जमिनीचे संपादन केले आहे. गुजरातमध्ये ७७ टक्के, दादरा नगर हवेलीत ८० टक्के आणि महाराष्ट्रातील २२ टक्के भूसंपादनाची प्रक्रिया आतापर्यंत पूर्ण झाली आहे. महाराष्ट्रातील पालघर आणि गुजरातमधील नवसारी या जिल्ह्यांतील जमिनीचे संपादन झालेले नाही. 

बुलेट ट्रेन प्रकल्पाला विलंब होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे जपानी येनच्या तुलनेत रुपयाची झालेली घसरण हे ही आहे. यामुळे या प्रकल्पाची किंमत आणखी मोठ्या प्रमाणात वाढू शकते. प्रकल्पाचा खर्च १.०८ लाख कोटी रुपयांवरून १.७० लाख कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली.  

कंपनीने यासाठी मागील वर्षी बांधकामासाठीच्या नऊ निविदा काढण्याचा निर्णय घेतला होता परंतु, कोरोनामुळे पुढील कार्यवाही करणे शक्य झाले नाही. स्थानके, पूल, क्रॉसिंगसाठीचे छोटे पूल, देखभाल डेपो आणि बोगदे आदींच्या उभारणीसाठी काढलेल्या एका निविदेची किंमत सुमारे २० हजार कोटी रुपये एवढी आहे. एकूण ५०८ पैकी ३४५ किलोमीटरपर्यंतच्या मार्गाच्या कामासाठी याआधीच काही निविदा काढण्यात आल्या आहेत. 

रेल्वे महामंडळाच्या प्रवक्त्याने मात्र हा प्रकल्प कोणत्याही स्थितीमध्ये २०२३ पर्यंत पूर्ण करण्यात येईल, असा दावा केला  आहे. कोरोनामुळे काही निविदा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या प्रकल्पावर किती परिणाम झाला याचे मूल्यमापन सुरू आहे. या संसर्गाचा परिणाम किती काळ टिकेल, हे सांगता येणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.  

बुलेट ट्रेनच्या प्रकल्पासाठी ५०८.१७ किलोमीटर लांबीचे महामार्गांचे जाळे उभारले जाणार असून, ते महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे आणि पालघर या तीन जिल्ह्यांतून जाईल तर, गुजरातमधील वलसाड, नवासारी, सुरत, भरूच, बडोदा, आनंद, खेडा आणि अहमदाबाद या आठ जिल्ह्यांतून जाईल. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com