तालिबानमध्ये वाद पेटला; उपपंतप्रधानाचे काबूल सोडून कंदाहारला पलायन

सत्ता हाती मिळताच तालिबानमधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. यामुळे उपपंतप्रधान बरादर याने काबूल सोडून कंदाहारला पलायन केले आहे.
mullah baradar fled to kandahar after fight with khalil haqqani
mullah baradar fled to kandahar after fight with khalil haqqani

काबूल : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानकडून (Taliban) हंगामी सरकारची घोषणा करण्यात आली असून, मोहम्मद हसन अखुंद हा सरकारचं नेतृत्व करणार आहे. देशाचे पंतप्रधानपद अखुंद याच्याकडे तर उपपंतप्रधानपद मुल्ला अब्दुल गनी बरादर (Mullah Baradar) याच्याकडे देण्यात आले आहे. सत्ता हाती मिळताच तालिबानमधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. यामुळे उपपंतप्रधान बरादर याने काबूल सोडून कंदाहारला पलायन केले आहे.  

अफगाणिस्तानच्या अध्यक्षीय प्रासादात काही दिवसांपूर्वी तालिबानचे दोन गट आमनेसामने आले होते. त्यावेळी गोळीबारही झाला होता आणि काही जण जखमी झाले होते. यानंतर उपपंतप्रधान बरादर आणि मंत्री खलिल उर-रहमान हक्कानी यांच्यात शाब्दिक वाद झाला. हक्कानी हा हक्कानी नेटवर्कचा म्होरक्या आहे. अफगाणिस्तानमधील विजयाचे श्रेय कुणाचे यावरून हा वाद झाला होता. बरादर याने हा विजय राजनैतिक चर्चेच्या माध्यमातून मिळवल्याचा दावा केला आहे. तर हक्कानी याने हा विजय लढाईतून मिळाल्याचे म्हटले आहे. 

यानंतर बरादर हा गायब झाला होता. त्याच्या गायब होण्याबद्दल वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात होते. बरादरचा मृत्यू अथवा तो गंभीर जखमी झाल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले होते. अफगाणिस्तानच्या अध्यक्षीय प्रासादात झालेल्या गोळीबारात बरादरचा मृत्यू अथवा तो गंभीर जखमी झाला असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. अखेर तालिबानने बरादर जिवंत असल्याचा दावा केला आहे. त्याची ऑडिओ क्लिपही तालिबानने जारी केली आहे. त्याने काबूल सोडून कंदाहारला पलायन केले आहे. 

तालिबानने नुकतेच मंत्रिमंडळ जाहीर केले. हे मंत्रिमंडळ अंतरिम असून त्यामध्ये आणखी काही मंत्र्यांच्या नावे समाविष्ट केली जाणार आहेत. पंतप्रधानपद मिळालेला अखुंद हा तालिबानचा संस्थापक मुल्ला उमर याचा सहकारी आहे. तो सध्या तालिबानमध्ये महत्वाचे निर्णय घेणाऱ्या परिषदेचा प्रमुख आहे. त्याचं नाव संयुक्त राष्ट्राच्या दहशतवाद्यांच्या यादीतही असल्याचं वृत्त आहे. 

मुल्ला बरादर याच्याकडे उपपंतप्रधानपद देण्यात आले आहे. तालिबानच्या राजकीय विभागाचा प्रमुख असलेला बरादर सरकारचं नेतृत्व करेल, अशी काही दिवसांपपर्यंत चर्चा होती. त्याला उपपंतप्रधानपद देण्यात आलं आहे. तोही तालिबानचा सहसंस्थापक आहे. अमेरिकेने दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केलेल्या हक्कानी नेटवर्कचा संस्थापकाचा मुलगा असलेला सराजुद्दीन हक्कानी यालाही मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. त्याच्याकडं देशांतर्गत बाबींचे मंत्रिपद आलं आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com