शिवराजमामा म्हणाले, माझा काही औरंगजेबाचा खजिना नाही... - MPs coffers are not Aurangzebs treasure says Shivraj Singh Chouhan | Politics Marathi News - Sarkarnama

शिवराजमामा म्हणाले, माझा काही औरंगजेबाचा खजिना नाही...

वृत्तसंस्था
बुधवार, 28 ऑक्टोबर 2020

मध्य प्रदेशात मिनी विधानसभा ठरणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. राज्यात यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. 

भोपाळ : मध्य प्रदेशचा खजिना मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी रिकामा केला, असा आरोप काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केला होता. यावर शिवराजसिंह यांनी उत्तर दिले असून, राज्याचा खजिना हा औरंगजेबाचा खजिना नाही, असे म्हटले आहे. विकासासाठी कमलनाथ यांनी एकही छदाम खर्च केला नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. 

अनुप्पूर मतदारसंघातील जाहीर सभेत बोलताना शिवराजसिंह चौहान म्हणाले की, विकासासाठी एकही पैसा न द्यायला मी काही कमलनाथ नाही. मी तुम्हाला अनुप्पूरच्या विकासाचे आश्वासन देतो. कमलनाथ नेहमी म्हणतात की, मामांनी राज्याचा खजिना रिकामा केला. मी तुम्हाला सांगू इच्छितो की रिकामा व्हायला हा औरंगजेबाचा खजिना नाही. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी बोलताना चौहान म्हणाले की, आधीच्या पंतप्रधानांनी शेजारील छोट्या देशांनी दिलेले आव्हानही स्वीकारले नव्हते. मोदींनी मात्र, शेजारी देशांनी योग्य पद्धतीने हाताळले आहे. आधी एखाद्या छोट्या देशाने आव्हान देऊनही पूर्वीचे पंतप्रधान काहीच कृती करीत नव्हते. आजच्या घडीला चीनने आपल्या सीमेवर नजर टाकली तर आमच्या जवानांनी त्यांच्या माना मोडल्या. चिनी सैनिकांना पुन्हा त्यांच्या हद्दीत पिटाळण्यात आले. आता आपल्याकडे डोळे वरुन पाहण्याचे धाडसही चीनमध्ये नाही. 

मध्य प्रदेशातील राजकीय वातावरण आता पुन्हा तापू लागले आहे. राज्यात 28 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका होत आहे. या निवडणुका 9 नोव्हेंबरला  होत आहेत. काँग्रेसचे सरकार पाडणाऱ्या भाजपला धडा शिकवण्यासाठी काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी कंबर कसली आहे. राज्यातील भाजप नेत्यांना फोडून ते मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि ज्योतिरादित्य शिंदे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.  

जोतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांच्यासोबत 22 आमदार काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले होते. त्यामुळे कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडले होते. आता राज्यात एकूण 28 मतदारसंघात पोटनिवडणुका होत आहेत. यातील तब्बल 16 ग्वाल्हेर भागातील आहेत. शिंदे यांच्या ग्वाल्हेर या बालेकिल्ल्यात कमलनाथ यांनी काही दिवसांपूर्वी जोरदार शक्तिप्रदर्शनही केले होते. यामुळे त्यांच्यात जोरदार आरोप - प्रत्यारोप सुरू आहेत. 

Edited by Sanjay Jadhav 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख