मंत्री आधी ब्युटी पार्लरमध्ये मग जनतेच्या सेवेत!

पावसात भिजूनते घरी आले तर त्यांच्या घरातील सदस्यही त्यांना ओळखणार नाहीत, असा टोला काँग्रेसनं लगावला आहे.
मंत्री आधी ब्युटी पार्लरमध्ये मग जनतेच्या सेवेत!
vishawas sarang Narrottam Mishra

भोपाळ : महाराष्ट्रात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी हा रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं होतं. मध्य प्रदेशातही एका आमदारानं मंत्र्यांवर टीका करताना ते सकाळी लोकांमध्ये जाण्याआधी दोन-तीन तास ब्युटी पार्लरमध्ये घालवतात, अशी टीका केली आहे. त्यावरूनही आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहे. (MP minister visits beauty parlour daily says Congress MLA)

मध्य प्रदेशातील काँग्रेसचे आमदार आरीफ मसूद (Arif Masood) यांनी बुधवारी हे वक्तव्य केलं आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री विश्वास सारंग (Vishwas sarang) यांच्यावर त्यांनी टीका केली आहे. एका आंदोलनादरम्यान बोलताना मसूद म्हणाले, या भागातील आमदार (विश्वास सारंग) सकाळाच बराच वेळ ब्युटी पार्लरमध्ये घालवतात. सध्या स्पर्धा सुरू झाली आहे. गृहमंत्री नरोत्तम मिश्रा त्यांना स्मार्ट म्हणतात, म्हणून मंत्र्यांचा बराच वेळ ब्युटी पार्लरमध्ये जातो. ते दोन-तीन तासांनीच परत येतात, असा टोला मसूद यांनी लगावला आहे. 

एवढ्यावरच न थांबता मसूद म्हणाले, पावसात फिरताना छत्रीशिवाय त्यांनी फिरावं. असं केल्यानंतर ते घरी आले तर त्यांच्या घरातील सदस्यही त्यांना ओळखणार नाहीत, असं मसूद म्हणाले. मसूद यांच्या या वक्तव्यावरून भाजपने निशाणा साधला आहे. काँग्रेसच्या नेत्यांना सध्या कोणतंही काम नसल्यानं अशी वक्तव्य केली जात असल्याचं भाजपचे प्रवक्ते पंकज चतुर्वेदी म्हणाले. 

कमल नाथ आणि त्यांचे इतर नेते तयार होण्यासाठी किती वेळ लागतो, हेही मसूद यांनी सांगावं, असं आव्हान चतुर्वेदी यांनी मसूद यांना दिलं. काँग्रेस नेत्यांनी मसूद यांची पाठराखण केली आहे. भोपाळ जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष कैलास मिश्रा यांनी मसूद खरे बोलल्याचे सांगितले. तसेच प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते नरेंद्र सलुजा हेही मसूद काहीही खोटं बोलत नसल्याचे सांगत त्यांच्या मदतीला धावले. 

दररोज सकाळी ब्युर्टी पार्लरमधून आल्यानंतर नरोत्तम मिश्रा माध्यमांशी बोलतात. अंतर्गत राजकारणामुळं मुख्यमंत्र्यांनी सारंग यांना त्यांच्याविरोधात तयार केलं आहे. त्यामुळं सारंगही दररोज ब्युटी पार्लरमधून जाऊन नंतर माध्यमांसमोर येतात, अशी टीका सलुजा यांनी केली. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in