बॉम्बस्फोटाच्या तपासासाठी दिल्लीच्या रस्त्यावर जेव्हा उतरली होती 'मोसाद'... - mossad is investigating israel embassy bomb blast in new delhi | Politics Marathi News - Sarkarnama

बॉम्बस्फोटाच्या तपासासाठी दिल्लीच्या रस्त्यावर जेव्हा उतरली होती 'मोसाद'...

वृत्तसंस्था
शनिवार, 30 जानेवारी 2021

दिल्लीत इस्रायली दूतावासासमोर झालेल्या बॉम्बस्फोटाने खळबळ उडाली आहे. याआधी 2012 मध्ये दिल्लीत झालेल्या स्फोटाच्या तपासात इस्रायची गुप्तहेर संस्था मोसादने उडी घेतली होती.

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत इस्रायली दूतावासाबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटाच्या तपासात इस्रायली गुप्तहेर संस्था 'मोसाद'ही उतरणार आहे. या स्फोटामागे इराणमधील रिव्होल्युशनरी गार्ड कोअर आणि तिच्या क्वाड्स फोर्सचा हात असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. याआधी 2012 मध्ये दिल्लीत झालेल्या स्फोटाचा तपासासाठी 'मोसाद' दिल्लीतील रस्तांवर उतरली होती.

दिल्लीत काल (ता.29) झालेल्या स्फोटाचा तपास इस्रायली गुप्तचर संस्था 'मोसाद'ने सुरू केला आहे. यानंतर यामागे जागतिक पातळीवरील मोठा कट असल्याचे समोर आले आहे. तसेच, या स्फोटामागील इराण कनेक्शनही उघड झाले आहे. याआधी दिल्लीत 2012 मध्ये स्फोट झाला होता. या स्फोटाचा तपास त्यावेळी 'मोसाद'ने केला होता. त्याचवेळी इतर देशातही इस्त्रायलला लक्ष्य करणारे हल्ले झाले होते. त्याच दिवशी जॉर्जिया आणि थायलंडमध्ये इस्त्रायली दूतावासातील अधिकाऱ्याच्या मोटारीखाली बॉम्बस्फोट घडवण्यात आले होते. 

2012 मध्ये असा झाला होता स्फोट 
2012 मध्ये इस्रायली दूतावासातील अधिकाऱ्याची पत्नी शाळेतून मुलांना आणण्यासाठी मोटारीतून जात होती. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या व्यक्तीने चुंबकीय स्फोटक मोटारीला चिकटवले. मोटार औरंगजेब रस्त्यावरील सिग्नलवर पोचल्यानंतर स्फोट होऊन मोटारीने अचानक पेट घेतला होते. यानंतर अधिकाऱ्याच्या पत्नीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यातून ती बचावली होती.

कालच्या स्फोटानंतर आज राष्ट्रीय सुरक्षा पथकाच्या (एनएसजी) अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली. तपास यंत्रणांच्या हाती काही महत्त्वपूर्ण पुरावे लागले आहेत. या स्फोटासाठी अमोनिअम नायट्रेटचा वापर करण्यात आला आहे. घटनास्थळावरून गुलाबी रंगाची ओढणी आणि इस्रायली राजदूताचा उल्लेख असलेला एक लिफाफा जप्त केला आहे. या लिफाफ्यामध्ये एक कागद आढळून आला असून त्यामध्ये हा फक्त ट्रेलर आहे असे लिहिले आहे. सध्या न्यायवैद्यक शाखेचे अधिकारी याची पडताळणी करत आहेत. अज्ञातांनी शीतपेयाच्या बाटलीमध्ये स्फोटके आणि बेअरिंग ठासून भरली होती, असे तपास अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. 

एका कॅब चालकाच्या मदतीने पोलिसांनी संशयितांची रेखाचित्रे जारी केली आहेत. त्याद्वारे आरोपींचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी शुक्रवारी रात्री छापे घालत काही संशयितांना ताब्यात घेतल्याचे समजते. राष्ट्रीय तपास संस्था आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी स्थानिक इराणी नागरिकांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख