पारदर्शक करप्रणाली पोर्टलचे आज मोदींच्या हस्ते उदघाटन 

नरेंद्र मोदी 'पारदर्शी कराधान - ईमानदार का सन्मान' नावाच्या एक मंचाचे (पोर्टल) आज (ता.१३) व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे उद्घाटन करणार आहेत.
Narendra Modi.jpeg
Narendra Modi.jpeg

नवी दिल्ली : प्रामाणिकपणे कर भरणाऱ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 'पारदर्शी कराधान - ईमानदार का सन्मान' नावाच्या एक मंचाचे (पोर्टल) आज (ता.१३) व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) याबाबतची माहिती दिली आहे.

उद्घाटन कार्यक्रमाला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन व राज्यमंत्री अनुराग ठाकुर हेही उपस्थित राहतील. या नव्या योजनेमध्ये प्राप्तिकर विभागाचे अधिकारी, उद्योग, लेखापरीक्षक महासंघ व वाणिज्य जगतातील नामवंत संस्थांचा सहभाग असेल. हा नवा मंच म्हणजे करभरणा करण्यातील ब्रिटिशकालीन क्‍लिष्टता टाळून ही प्रक्रिया अधिकाधिक सुलक्ष करण्यासाठीचे पाऊल असणार आहे. 

मोदी सरकारने मागील वर्षी उद्योगांवर लावण्यात येणारा कॉर्पोरेट टॅक्‍स ३० टक्‍क्‍यांवरून २२ टक्‍क्‍यांपर्यंत व नव्या उद्योजकांसाठी तर तो १५ टक्‍क्‍यांपर्यंत घटविण्याचा निर्णय केला होता. नव्या योजनेत कर कमी करणे व प्रत्यक्ष कर कायदे आणखी सुलभ करण्यावर भर राहील. याशिवाय प्राप्तिकर विभागाच्या कामकाजात अधिक पारदर्शकता व दक्षता आणण्याचेही प्रयत्न केले जाणार आहेत.

दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या थकित करदात्यांसाठी या विभागाने ‘विवाद से विश्‍वास अधिनियम २०२०' यापूर्वीच सादर केला आहे. विलंबीत करदात्यांना काही दिलासा देण्यासाठी अर्थमंत्रालय एक विस्तृत योजनाही तयार करत आहेत. संसदेच्या आगामी अधिवेशनात तिचे सूतोवाच केले जाईल. कोविड-१९ महामारीमुळे करदात्यांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी प्राप्तिकर परतावा भरण्याची मुदत यंदा आधीच वाढविण्यात आली आहे. याशिवाय नवनवीन उपाययोजनाही अर्थमंत्रालयाच्या विचाराधीन आहेत.

स्वनिधी योजनेला लाखोंचा प्रतिसाद
आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत केंद्रीय नगरविकास व गृहनिर्माण विभागातर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘पंतप्रधान स्वनिधी' सुलभ कर्ज योजनेसाठी पहिल्या ४१ दिवसांत पाच लाखांहून जास्त लोकांनी अर्ज केल्याची माहिती देण्यात आली आहे. यातील एक लाख लोकांचे कर्ज मंजूरही करण्यात आले आहे.

कोरोना लॉकडाउनमुळे उपासमारीची वेळ आलेले पदपथावरिल विक्रेते व छोट्या विक्रेत्यांना सुलभपणे कर्ज देण्याची ही योजना आहे. त्यात एका वर्षासाठी १० हजारांपर्यंतचे कर्ज जामीनदार नसतानाही दिले जाते. नियमितपणे परतफेड करणाऱ्या कर्जदारांना व्याजात वार्षिक ७ टक्‍क्‍यांची सूट आणि डिजीटल व्यवहार करणाऱ्यांना १२०० रूपयांचा कॅश बॅकही या योजनेत मिळणार आहे.
Edited  by : Mangesh Mahale   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com