मोदी सरकारचं ऐतिहासिक पाऊल; स्वतंत्र सहकार मंत्रालयाची निर्मिती - Modi Government creates a new Ministry of Co-operation | Politics Marathi News - Sarkarnama

मोदी सरकारचं ऐतिहासिक पाऊल; स्वतंत्र सहकार मंत्रालयाची निर्मिती

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 जुलै 2021

सहकारातून समृध्दीकडे हे उद्दिष्ट निश्चित कऱण्यात आले आहे.

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने ऐतिहासिक पाऊल उचलत स्वतंत्र सहकार मंत्रालयाची निर्मिती केली आहे. सहकार से समृती हे ब्रीदवाक्य ठेवत हे मंत्रालय सुरू करण्यात आलं आहे. देशातील सहकार चळवळ अधिक बळकट करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे पाऊल महत्वाचे ठरणार आहे. मंत्रीमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर नवीन मंत्रालय तयार करण्यात आल्याने हे खातं कुणाकडं जाणार याबाबत उत्सुकता आहे. (Modi Government creates a new Ministry of Co-operation)

भारतात महाराष्ट्रसह अनेक राज्यांमध्ये सहकारी संस्थांचे मोठे जाळे आहे. या सहकारी संस्थांवर राज्यातील करोडो नागरिकांचे दैनंदिन जगणं अवलंबून आहे. अनेक राज्यांना समृध्द करण्यात सहकाराचा वाचा मोलाचा आहे. पण मागील काही वर्षांत अनेक सहकारी संस्थांची अवस्था बिकट झाली आहे. ही चळवळ मोडकळीस येण्याची भीती सातत्याने व्यक्त केली जाते. यापार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा : ...तर ममता बॅनर्जींचे मुख्यमंत्रीपद येईल धोक्यात; भाजपच ठरेल मोठा अडसर

देशातील सहकार चळवळीला बळकट करण्यासाठी तसेच त्याची पाळेमुळे अधिक खोलवर रुजवण्यासाठी स्वतंत्र सहकार मंत्रालयाची निर्मिती करण्यात आली आहे. सहकारातून समृध्दीकडे हे उद्दिष्ट निश्चित कऱण्यात आले आहे. या मंत्रालयाला स्वतंत्र प्रशासन, कायदेशीर व धोरणात्मक आराखडा असेल. शेतकऱ्यांच्या सबलीकरणासाठीही हे मंत्रालय महत्वाचं ठरणार असल्याने या निर्णयाला महत्व प्राप्त झाले आहे. 

मोदी सरकारच्या मंत्रीमंडळाचा बुधवारी विस्तार

मोदी सरकारचा उद्या मंत्रीमंडळ विस्तार आहे. त्याच्या आदल्यादिवशीच नवी मंत्रालयाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळं या खात्याची जबाबदारी कोणत्या नेत्याच्या खांद्यावर पडणार याबाबत उत्सुकता आहे. हे खातं मिळणारे पहिले मंत्री कोण असणार यासाठी बुधवारी सायंकाळपर्यंतची वाट पाहावी लागणार आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडून केंद्रीय मंत्रिमंडळाचा (Union Cabinet) मेगाविस्तार होणार आहे. यामध्ये राज्यातील भाजपचे नेते नारायण राणे, हिना गावित आणि कपिल पाटील यांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बुधवारी (ता. 7) संध्याकाळी हा विस्तार होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळं तिघांनाही काही तासांतच मंत्रीपदाची गोड बातमी मिळण्याची शक्यता आहे. (Union Cabinet reshuffle likely to take place tomorrow evening)

देशातील पाच राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मंत्रिमंडळ विस्तारामध्ये नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात 81 मंत्री असू शकतात परंतु, सध्या ही संख्या 53 आहे. यामुळे 28 नवीन सदस्यांचा समावेश होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मंत्रिमंडळ विस्ताराविषयी काही दिवसांपूर्वी चर्चा केली होती. त्यांनी मंत्रिमंडळातील सदस्यांना गटाने बोलावून त्यांच्याशी चर्चाही केली होती.

मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातून नारायण राणे, कपिल पाटील हिना गावीत यांची नावे चर्चेत आहेत. मराठा आरक्षण प्रश्नामुळे राणेंसारख्या मराठा चेहऱ्याला संधी दिली जाईल, असे मानले जात आहे. याचबरोबर बीडच्या भाजप खासदार प्रितम मुंडे यांना स्थान दिले जाण्याची शक्यता आहे. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या प्रितम यांना स्थान दिले जाण्याची शक्यता अधिक आहे. बुधवारी सायंकाळी मंत्रीमंडळ विस्तारावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख