खट्टर सरकार अडचणीत...आमदार संगवानांनी पाठिंबा काढून घेतला - mla sombir sangwan withdrew support of bjp government in haryana | Politics Marathi News - Sarkarnama

खट्टर सरकार अडचणीत...आमदार संगवानांनी पाठिंबा काढून घेतला

वृत्तसंस्था
मंगळवार, 1 डिसेंबर 2020

शेतकरी आंदोलनाचा पहिला धक्का हरियानातील भाजप सरकारला बसला आहे. महामंडळाचा राजीनामा देऊन एका आमदाराने सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. 

नवी दिल्ली : कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.  शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमांवरच ठाण मांडल्याने दिल्लीला वेढा पडल्याची स्थिती निर्माण झाली आहे. हरियानात या आंदोलनामुळे राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. हरियानात अपक्ष आमदार सोमबीर संगवान यांनी या मुद्द्यावर पशुसंवर्धन महामंडळाचा राजीनामा दिला होता. आज त्यांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे.  
हरियानातील मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर सरकारवर शेतकरी आंदोलकावर बळाचा वापर केल्याप्रकरणी मोठी टीका होत आहे. आता खट्टर सरकारला शेतकरी आंदोलनाचा पहिलाच मोठा दणका बसला आहे. आमदार सोमबीर संगवान यांनी हरियाना पशुसंवर्धन महामंडळाचा राजीनामा दिला आहे. संगवान हे दादरी मतदारसंघातील अपक्ष आमदार आहेत. त्यांनी सरकारला पाठिंबा दिल्याने त्यांची महामंडळावर नियुक्ती करण्यात आली होती. शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी त्यांनी महामंडळाचा राजीनामा दिला आहे. 

संगवान हे संगवान खापचे प्रमुख आहे. या खापच्या कार्यक्षेत्रात भिवानी आणि दादरी जिल्ह्यातील सुमारे 40 गावे येतात. संगवान यांनी खट्टर यांना महामंडळाचा राजीनामा पाठवला आहे. संगवान यांनी आज खट्टर सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याचा निर्णय आज जाहीर केला. आता संगवान यांच्या नेतृत्वाखाली खाप पंचायत शेतकरी आंदोलनात उतरत आहे. 

खट्टर सरकार जननायक जनता पार्टीच्या पाठिंब्यावर तरुन आहे. आता संगवान यांना पाठिंबा काढल्याने सरकारला काठावरचे बहुमत आहे. याआधी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर अपक्ष आमदार बलराज कुंडू यांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. यामुळे खट्टर सरकार अडचणीत आले आहे. 

केंद्रीय कृषिमंत्री तोमर यांनी शेतकरी नेत्यांसमोर आज पुन्हा एकदा चर्चेचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यांनी नियोजित बैठकीच्या तीन दिवस आधी चर्चेचा प्रस्ताव ठेवला आहे. ते म्हणाले की, आधी ३ डिसेंबरला चर्चा होणार होती. परंतु, थंडी आणि कोरोनाच्या संसर्गामुळे आम्ही आजच बैठक बोलावली आहे. शेतकरी नेत्यांना आज वाजता विज्ञान भवनात चर्चेसाठी बोलावले आहे. चर्चेद्वारे तोडगा काढण्याचे आवाहन आम्ही शेतकऱ्यांना करीत आहोत. 

सिंघू आणि टिकरी सीमेवर आंदोलनाचा शेतकऱ्यांच्या आज सलग सहावा दिवस आहे. केंद्र सरकारने चर्चेसाठी कोणतीही अट घालू नये, अशी भूमिका शेतकरी नेत्यांनी घेतली आहे. राष्ट्रीय किसान महासंघ आणि भारतीय किसान युनियनच्या अनेक गटांनी दिल्ली चलो या आंदोलनाची हाक दिली आहे. 

दिल्लीत आंदोलनासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना सीमेवर अडवून त्यांच्यावर बळाचा वापर करणारे हरियाना आणि दिल्लीतील पोलीस टीकेची धनी बनले आहेत. भाजप सरकारकडून शेतकऱ्यांवर लाठीमार करण्यासोबत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. यात अनेक शेतकरी जखमी झाले आहेत. शेतकऱ्यांवर पोलिसांकडून खुनाच्या प्रयत्नासह दंगल आणि कोरोनाविषयक नियमांच्या भंगाचे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख