योगी सरकारमधील मंत्र्याकडून मुनव्वर राणा यांना एन्काऊंटरची धमकी - UP Minister Anand Swaroop Shukla attacks on shayar Munawwar Rana | Politics Marathi News - Sarkarnama

योगी सरकारमधील मंत्र्याकडून मुनव्वर राणा यांना एन्काऊंटरची धमकी

वृत्तसंस्था
बुधवार, 21 जुलै 2021

काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांच्यावरही निशाणा साधला आहे.

लखनौ : देशाच्या 1947 मध्ये झालेल्या फाळणीनंतर जे लोक भारतात थांबले, तेच आता देशाला तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. जे भारताच्या विरोधात उभे राहतील, त्यांना एन्काऊंटरमध्ये मारले जाईल, असं वादग्रस्त वक्तव्य उत्तर प्रदेशातील एका मंत्र्याने केलं आहे. या वक्तव्यावरून उत्तर प्रदेशातील राजकारण तापण्याची चिन्हं आहेत. (UP Minister Anand Swaroop Shukla attacks on shayar Munawwar Rana)

योगी सरकारमधील राज्यमंत्री आनंद स्वरुप शुक्ला यांनी हे वक्तव्य केलं आहे. साहित्य अकादमी पुरस्कार विजेते उर्दूतील प्रसिद्ध कवी मुनाव्वर राणा यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्यावर बोलताना शुक्ला यांनी हे विधान केलं आहे. उत्तर प्रदेशात पुन्हा भाजपची सत्ता आल्यास राज्य सोडू. हे राज्य मुस्लिमांसाठी सुरक्षित राहिले नसल्याचे आपण मानू, असं राणा म्हणाले होते. 

हेही वाचा : 1930 पासून मुस्लिमांची संख्या सुनियोजितपणे वाढवली; मोहन भागवतांचं मोठं विधान

यावर बोलताना शुक्ला म्हणाले, राणा यांच्यासारख्या लोकांनी राज्यच नव्हे तर देश सोडून जायला हवे. भारतीयांच्या विरोधात उभे राहणारे लोक एन्काऊंटरमध्ये मारले जातील.1947 मध्ये फाळणी झाल्यानंतर जे भारतात थांबले त्यापैकी राणा आहेत. ते इथे थांबून देशाला तोडण्याचे षडयंत्र करणाऱ्या लोकांमध्ये सहभागी झाले, असेही शुक्ला म्हणाले. या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला असून त्याचे पडसाद राजकीय पटलावरही उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

शुक्ला यांनी काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांच्यावरही निशाणा साधला आहे. त्यांनी प्रियांका यांच्या तीन दिवसीय यूपी दौऱ्यावर टीका केली. प्रियांका गांधी या राजकीय पर्यटक आहेत. दीड वर्षांनी उत्तर प्रदेशचे हवामान आणि पाऊस पाहायला आल्या आहेत. लोक त्यांना बघायला येतात, असं शुक्ला म्हणाल्या.

दरम्यान, उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणूक 2022 मध्ये होणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व भाजपकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. भाजपने आतापासूनच कंबर कसली असून पुन्हा सत्ता मिळवण्याचे प्रयत्न आहेत. तर प्रियांका गांधीही युपीच्या मैदानात उतरल्या आहेत. त्यांनी संपूर्ण राज्य पिंजून काढण्यासाठी दौरा सुरू केला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख