निवडणुकीचा पत्ता नाही, अद्याप भाजपमध्ये प्रवेश नाही अन् सांगितला मुख्यमंत्रिपदावर दावा - metro man sreedharan says ready to accept chief minister post of kerala | Politics Marathi News - Sarkarnama

निवडणुकीचा पत्ता नाही, अद्याप भाजपमध्ये प्रवेश नाही अन् सांगितला मुख्यमंत्रिपदावर दावा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021

मेट्रोमॅन ई.श्रीधरन हे भाजपच्या वाटेवर आहेत. त्यांनी अद्याप भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला नसला तरी मुख्यमंत्रिपदावर दावा सांगितला आहे. 

नवी दिल्ली : मेट्रोमॅन ई.श्रीधरन हे आता राजकीय इनिंग सुरू करीत आहेत. ते भाजपच्या वाटेवर आहेत. त्यांचा भाजप प्रवेश पुढील आठवड्यात होणार आहेत. मात्र, भाजपमध्ये प्रवेश करण्याआधीच मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. केरळमध्ये भाजप सत्तेवर आल्यास मुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास तयार असल्याचे ई. श्रीधरन यांनी म्हटले केले आहे. 

ई.श्रीधरन हे पुढील आठवड्यात भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केरळमधील राजकीय वातावरण तापले आहे. राजकीय इनिंग सुरू होण्याआधीच श्रीधरन यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पक्षात प्रवेश करण्याआधीच त्यांनी मुख्यमंत्रिपदावर दावा केल्याने भाजपमधील काही नेतेही खासगीत नाराजी व्यक्त करीत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

भाजपच्या केरळ प्रदेशाध्यक्षांनी श्रीधरन हे पक्षात प्रवेश करणार असल्याबाबतची घोषणा केली आहे. श्रीधरन यांनीही त्यास दुजोरा दिला आहे. या पार्श्‍वभूमीवर ते म्हणाले, भाजपची इच्छा असल्यास मी केरळ विधानसभा निवडणूक लढेन. तसेच, पक्षाने विचारल्यास मुख्यमंत्रिपद स्वीकारण्यासही माझी तयारी आहे. केरळमध्ये भाजप सत्तेवर आल्यास पायाभूत सुविधांच्या विकासावर लक्ष केंद्रित केले जाईल. याचबरोबर राज्याला कर्जमुक्त करण्यावर भर दिला जाईल. 

केरळ राज्य हे कर्जाच्या खाईत सापडले आहे, असे सांगून श्रीधरन म्हणाले की, राज्यावर कर्जाचा मोठा बोजा आहे. राज्यातील प्रत्येक मल्याळी नागरिकाच्या डोक्यावर आजच्या घडीला 1.2 लाख रुपयांचे कर्ज आहे. याचाच अर्थ राज्य दिवाळखोरीच्या वाटेवर आहे. परिस्थिती एवढी बिघडलेली असतानाही सरकार कर्ज घेतच आहे. राज्याचे कर्ज कमी करण्यासाठी आता उपाय शोधायला हवेत. यासाठी वित्त आयोगाची स्थापना करण्याची आवश्यकता आहे. 

केरळमध्ये एप्रिल-मे महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या ८८ वर्षांच्या श्रीधरन यांनी राज्यपालपदात कोणताही रस नसल्याचे सांगितले आहे. राज्यपाल हे पद संपूर्णपणे घटनात्मक आहे. या पदावरून राज्याच्या विकासासाठी भरीव कार्य करता येणार नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. 

केरळमध्ये सध्या डाव्यांच्या लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंटचे (एलडीएफ) सरकार आहे. काँग्रेसप्रणित युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (यू़डीएफ) विरोधात आहे. मागील अनेक वर्षे राज्यात या दोन्ही आघाड्यांकडे सत्ता राहिली आहे. राज्यात भाजपचे स्थान अगदी नगण्य आहे. श्रीधरन यांनी पक्षात प्रवेश केल्यास फायदा होईल, असा भाजपचा कयास आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख