एमबीबीएसच्या विद्यार्थ्याने कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला अन् झाला कोरोना!

कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा देशात सुरू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कोरोना लस टोचून घेतली आहे.
mbbs student in mumbai tests covid19 positive after taking corona vaccine
mbbs student in mumbai tests covid19 positive after taking corona vaccine

नवी दिल्ली : देशात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. आजपासून 60 वर्षांवरील नागरिक आणि दुर्धर आजार असलेल्या 45 वर्षांवरील नागरिकांना कोरोना लस दिली जात आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कोरोना लस टोचून घेतली. दरम्यान, दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरू असताना एमबीबीएसच्या एका विद्यार्थ्याने कोरोना लशीची दोन डोस घेऊनही त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याची बाब समोर आली आहे. 

जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास 16 जानेवारीला देशात सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन झाले होते. केंद्र सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. यात पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश होता. 

आता दुसऱ्या टप्प्यात ही लस 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना दिली जात आहे. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील रुग्णांचाही यात समावेश आहे. सरकारी रुग्णालयात ही लस मोफत मिळेल मात्र, खासगी रुग्णालयात यासाठी 250 रुपये मोजावे लागतील. यात 100 रुपयांच्या सेवा शुल्काचा समावेश असेल, असे सरकारने जाहीर केले आहे.  

आता एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्याला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्याने कोरोना लशीचे दोन डोस घेतल्यानंतर काही दिवसांतच त्याला कोरोना संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. कोरोना लशीचे दोन डोस घेतले तरी प्रतिकारक्षमता वाढीसाठी काही दिवस लागतात, असे डॉक्टरांनी सांगितले. 

या 21 वर्षीय विद्यार्थ्याने कोव्हिशिल्ड लस घेतली होती. त्याने मागील आठवड्यात लशीचा दुसरा डोस घेतला होता. त्याच्यात तापासह इतर लक्षणे दिसू लागल्याने त्याची चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तो पॉझिटिव्ह आल्याने त्याला सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याच्याबरोबर राहणाऱ्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना आता विलगणीकरणात ठेवण्यात आले आहे. त्याच्याबरोबर राहणाऱ्या इतर विद्यार्थ्यांनीही कोरोनाची लस घेतली होती. 

याविषयी बोलताना सेव्हन हिल्स हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. बालकृष्ण अडसूळ म्हणाले की, कोरोना लस घेतलेल्या सर्वांमध्ये निश्चित वेळेत रोगप्रतिकारकशक्ती विकसित होईलच असे नाही. संबंधित विद्यार्थ्याला काही सौम्य लक्षणे होती. त्याची प्रकृती आता स्थिर आहे. लस दिल्यानंतर पूर्णपणे रोगप्रतिकारशक्ती विकसित होण्यासाठी सुमारे 45 दिवसांपर्यंत कालावधी लागतो. दुसरा डोस स्वीकारल्यानंतर लगेचच संबंधित विद्यार्थ्याला कोरोनाचा संसर्ग झाला. 

सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे.  सध्या दोन कोरोना लशी उपलब्ध असून, आणखी सात कोरोना लशींवर काम सुरू असल्याचे सरकारने नुकतेच जाहीर केले होते. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी ही माहिती दिली होते. प्रत्येक भारतीयाला ही लस देण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com