ईशान्येत भाजपचा काँग्रेसी चेहऱ्यांवर विश्वास; सर्व मुख्यमंत्री कधीकाळी गांधींचे निकटवर्तीय
North East | BJP Sarkarnama

ईशान्येत भाजपचा काँग्रेसी चेहऱ्यांवर विश्वास; सर्व मुख्यमंत्री कधीकाळी गांधींचे निकटवर्तीय

North East | BJP | Tripura : २०१४ नंतर भाजपमध्ये आले अन् नशिब चमकले

(BJP Tripura politics latest News)

आगरतळा : त्रिपुरामधील (Tripura) मागील दोन दिवसांपासून सुरु असलेली राजकीय घडामोडींची उलथापालथ आज सकाळी शांत झाली. मुख्यमंत्री असलेले बिप्लब देब (biplav deo) यांनी काल (शनिवारी) दुपारी राजीनामा देत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. पण यानंतर काहीच वेळात माणिक साहा यांच्या रुपाने नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली, त्यानंतर अखेरीस त्यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ देखील घेतली.

माणिक साहा (manik saha) हे त्रिपुरा भाजपचे प्रदेशाध्यक्ष असून त्यांची मागील महिन्यातच राज्यसभा सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र साहा यांच्या निमित्ताने भाजपने आणखी एका काँग्रेसी चेहऱ्यावर विश्वास दाखवला असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तूळात मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. साहा यांनी २०१६ मध्ये काँग्रेस सोडली होती आणि भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर २०२० मध्ये त्यांना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बनवले होते.

साहा यांच्यासोबत भाजपचे ईशान्य भारतात ७ पैकी एकूण ४ राज्यात स्वतःते मुख्यमंत्री आहेत. मात्र हे सर्वच जण मूळचे काँग्रेस पक्षातील असून कधीकाळी गांधी घराण्याचे अत्यंत निकटवर्तीय समजले जायचे. मात्र आता ते भाजपमध्ये असून भाजपचे राज्यातील चेहरा बनले आहेत.

१. हेमंत बिस्वा सरमा :

हेमंत सरमा हे देखील पूर्वाश्रमीचे काँग्रेसी. २००६ पासून ते सातत्यानं आसामचे तत्कालीन मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. सातत्याने त्यांचे काँग्रेसमधील वजन वाढत होते आणि एक वेळ अशी आली कि ते राज्यातील पक्षाचे दोन नंबरचे नेते बनले. पण २०१४ मध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि मुख्यमंत्री गोगोई यांच्याशी त्यांचे वाद झाले अन् याच वादातूनच त्यांनी काँग्रेसला राम-राम करत भाजपची वाट धरली.

त्यानंतर सरमा यांनी २०१६ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला विजय मिळवून देण्यात अत्यंत महत्वाची भूमिका बजावली होती. २०१९ मध्ये संपूर्ण नॉर्थ-ईस्टमध्ये सरमा यांनी भाजपचं नेतृत्व केले. त्यात त्यांना चांगले यश मिळाले. लोकसभा निवडणुकीत भाजप आणि त्यांच्या सहयोगी पक्षांना पूर्वेकडील राज्यांमध्ये सर्वाधिक खासदार मिळाले होते. आताच्या विधानसभेत देखील त्यांनी पक्षाला सत्तेत कायम ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावली. यामुळेच अखेर भाजपकडून सरमा यांना मुख्यमंत्री पदी प्रमोशन मिळाले.

२. पेमा खांडू :

अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांची ओळख म्हणजे देशातील काही तरुण मुख्यमंत्र्यांच्या यादीतील एक नाव. २०१६ साली त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा ते केवळ ३७ वर्षांचे होते. आधी ते काँग्रेसमधूनच मुख्यमंत्री बनले होते, पण त्यानंतर अवघ्या २ महिन्यातच पक्षात फोडाफोडीचं राजकारण करून ४३ आमदारांसह त्यांनी पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल हा आपला स्वतंत्र पक्ष बनवला.

त्यानंतर खांडू यांनी ४ महिन्यात आपला पक्ष भाजपमध्ये विलीन केला आणि ते भाजपचे मुख्यमंत्री बनले, पुढे २०१९ मध्ये भाजपला ४१ जागांसह पूर्ण बहुमत आल्यावर भाजपकडून त्यांना दुसऱ्यांदा संधी देण्यात आली. सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होणारे ते अरुणाचल प्रदेशचे एकमेव मुख्यमंत्री आहेत.

३. एन बिरेन सिंग :

मणिपूरचे सध्याचे मुख्यमंत्री असलेले एन. बिरेन सिंग हे देखील मुळचे काँग्रेसी. काँग्रेसमध्ये असताना २००३ पासून २०१२ पर्यंत ते सलग मंत्रीमंडळात होते. मात्र २०१२ मध्ये पुन्हा सत्तेत आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री इबोबी सिंह यांच्या मंत्रीमंडळातून त्यांना डावलण्यात आले. तिथूनच त्यांचे काँग्रेससोबत संबंध खराब होण्यास सुरुवात झाली.

अखेरीस २०१६ मध्ये त्यांनी काँग्रेस सोडत भाजपमध्ये प्रवेश केला आणि २०१७ मध्ये मणिपूरमध्ये सत्ता आल्यावर भाजपकडून त्यांना विधिमंडळाचा नेता निवडत १५ मार्च २०१७ रोजी मुख्यमंत्री पदाची संधी देण्यात आली. ते अजून ही पदावर आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.