महाराष्ट्रातील कोरोनाचा प्रकार दक्षिणेत घालतोय धुमाकूळ... - maharashtra corona strain is spreading in southern states | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनास सुरवात

महाराष्ट्रातील कोरोनाचा प्रकार दक्षिणेत घालतोय धुमाकूळ...

वृत्तसंस्था
बुधवार, 5 मे 2021

देशातील कोरोना रुग्णसंख्येतील वाढ सुरूच असून, रुग्णसंख्येने 2 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. 

नवी दिल्ली : देशातील कोरोना (Corona)  रुग्णसंख्येतील वाढ सुरूच असून, रुग्णसंख्येने 2 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. महाराष्ट्रातील (Maharshtra) कोरोना विषाणूचा  प्रकार (Strain) दक्षिणेत धुमाकूळ घालत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगण राज्यातील सुमारे 50 ते 60 टक्के रुग्ण या प्रकारच्या कोरोना विषाणूचे आहेत. (maharashtra corona strain is spreading in southern states) 

हैदराबादमधील सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलेक्युलर बायोलॉजी (सीसीएमबी) या संस्थेने ही माहिती दिली आहे. संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील कोरोना विषाणूच्या प्रकाराचे नाव बी.1.36 (एन440के) असे आहे. तेलंगण आणि आंध्र प्रदेशात याने धुमाकूळ घातला आहे. या दोन्ही राज्यांत फेब्रुवारीपर्यंत या प्रकाराचे रुग्ण अधिक होते. नंतर या विषाणूपासून आणखी दोन प्रकार तयार झाले. यातील पहिला होता युके बी.1.1.7 आणि दुसरा होता डबल म्युटंट बी.1.617.  

हेही वाचा : पुढील 4 ते 6 आठवड्यांत देशातील कोरोना मृत्यू दुप्पट होणार 

बी.1.1.7 या विषाणूच्या प्रकारामुळे पंजाबमध्ये रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तसेच, केरळमध्ये कोरोनाचा कहर वाढण्यास बी.1.617 हा प्रकार कारणीभूत ठरला आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणमध्ये बी.1.616 चे प्रमाण एकूण रुग्णसंख्येत 50 टक्के आहे. याचवेळी बी.1.1.7 या प्रकारच्या विषाणूचे प्रमाण 10 टक्के आहे. 

देशात 24 तासांत 3 हजार 780 मृत्यू 
देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 2 कोटी 6 लाख 65 हजार 148 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 2 लाख 26 हजार 188 झाली आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत कोरोनाचे नवीन 3 लाख 82 हजार 315 रुग्ण सापडले आहेत.  मागील 24 तासांत 3 हजार 780 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

सक्रिय रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक 
देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 34 लाखांवर गेली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या वाढल्याने देशातील आरोग्य व्यवस्थेवरील ताण प्रचंड वाढला आहे. यामुळे रुग्णांसाठी रुग्णालये अपुरी पडू लागल्याचे चित्र आहे. देशातील कोरोनाची रुग्णसंख्या दररोज वेगाने वाढत आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 34 लाख 87 हजार 229 असून, एकूण बाधितांमध्ये याचे प्रमाण 16.87 टक्के आहे. देशात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 82.03 टक्के आहे. देशात बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 69 लाख 51 हजार 731 आहे. याचवेळी मृत्यूदर 1.09 टक्के आहे. 

देशातील कोरोना रुग्णसंख्या वाढीचे टप्पे 
20 लाख : 7 ऑगस्ट  (2020) 
30 लाख : 23 ऑगस्ट  
40 लाख : 5 सप्टेंबर  
50 लाख : 16 सप्टेंबर 
60 लाख : 28 सप्टेंबर 
70 लाख : 11 ऑक्टोबर  
80 लाख : 29 ऑक्टोबर  
90 लाख : 20 नोव्हेंबर 
1 कोटी : 19 डिसेंबर 
1.5 कोटी : 19 एप्रिल (2021)  
2 कोटी : 4 मे 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख