काँग्रेसचे नवीन प्रभारी पाटील म्हणतात, महाराष्ट्रात अनेक आव्हाने..! - maharashtra congress in charge H K Patil said lots of challenges in state | Politics Marathi News - Sarkarnama

काँग्रेसचे नवीन प्रभारी पाटील म्हणतात, महाराष्ट्रात अनेक आव्हाने..!

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 12 सप्टेंबर 2020

काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल झाले असून, अनेक ज्येष्ठांना जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रभारीपदी कर्नाटकातील नेते एच.के.पाटील यांची निवड पक्षाने केली आहे. 

बंगळूर  : महाराष्ट्र हे केवळ मोठे राज्य नाही, तर राजकीयदृष्ट्या देशातील सर्वात महत्वाचे राज्य आहे. महाराष्ट्रात अनेक आव्हाने आहेत. काँग्रेस कार्यकारी समितीच्या (सीडब्ल्यूसी) सदस्यत्वाबरोबरच माझ्याकडे महाराष्ट्राचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. महाराष्ट्र काँग्रेसला गतवैभव मिळवून देण्याचा माझा प्रयत्न असेल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे नूतन प्रभारी एच.के. पाटील यांनी म्हटले आहे. पक्षाने ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या जागी  पाटील यांची नियुक्ती केली आहे. 

काँग्रेसने संघटनात्मक बदल काल जाहीर केले. सोनिया गांधी या परदेश दौऱ्यावर आहेत. त्यामुळे पक्षाची अप्रत्यक्ष जबाबदारी राहुल गांधी यांच्यावर आली आहे. नव्या बदलांमध्ये संघटनेतील ज्येष्ठ नेते मोतीलाल व्होरा, गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खर्गे, लुईझिनो फालेरो, अंबिका सोनी यांच्याकडील जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. नवी कार्यकारिणी नियुक्त करतानाच नवे सरचिटणीसही नियुक्त करण्यात आले आहेत. 

पक्षाने काही राज्यांचे प्रभारीही बदललले आहेत. त्यात महाराष्ट्राची जबाबदारी खर्गे यांच्याऐवजी एच. के. पाटील यांच्याकडे देण्यात आली. हरियानाच्या जबाबदारीतून गुलाम नबी आझाद यांना मुक्त करण्यात आले असून, विवेक बन्सल यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. मुकुल वासनिक यांच्याऐवजी तारिक अन्वर यांच्याकडे केरळ व लक्षद्वीप, रणदीप सुरजेवाला यांच्याकडे कर्नाटक, रजनी पाटील यांच्याकडे जम्मू-काश्‍मीर तर राजीव शुक्‍ला यांच्याकडे हिमाचल प्रदेशाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 

याबाबत पाटील म्हणाले की, पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी माझ्यावर मोठी जबाबदारी सोपविली आहे. कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के शिवकुमार, विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या, मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह प्रमुख नेत्यांचा मी आभार मानतो. वीरप्पा मोईली यांनी मला पहिल्यांदा मंत्री केले. एस.एम. कृष्णा मुख्यमंत्री असताना मी जलसंपदामंत्री होतो. धरमसिंह मुख्यमंत्री झाल्यावर मी कायदामंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. सिद्धरामय्या मंत्रिमंडळात ग्रामविकासमंत्री म्हणून मी काम केले. आता मला एक नवी जबाबदारी दिली आहे.

मी विद्यार्थी असल्यापासूनच काँग्रेसकडे आकर्षित झालो. पक्षाकडून मला अनेक पदे व जबाबदाऱ्या मिळाल्या आहेत. आधी मल्लिकार्जुन खर्गे हे महाराष्ट्राचे प्रभारी होते. मला त्यांचा फायदा होईल व त्यांचे मार्गदर्शन मिळेल, असे पाटील यांनी नमूद केले.  

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख