आमदार दहावीच्या परीक्षेला बसल्या अन् एका विषयात केवळ एकाच गुणाने झाल्या नापास! - madhya pradesh bsp mla rambai govind singh parihar failed in tenth exam | Politics Marathi News - Sarkarnama

आमदार दहावीच्या परीक्षेला बसल्या अन् एका विषयात केवळ एकाच गुणाने झाल्या नापास!

वृत्तसंस्था
सोमवार, 1 फेब्रुवारी 2021

मध्य प्रदेशातील आमदार रामबाई गोविंदसिंह परिहार या दहावीच्या परीक्षेत नापास झाल्या आहेत. यावरुन सोशल मीडियावर मोठा गदारोळ सुरू झाला आहे.  

दमोह : मध्य प्रदेशातील दमोह जिल्ह्यातील पथरिया विधानसभा मतदारसंघातील बहुजन समाज पक्षाच्या (बसप) आमदार रमाबाई गोविंदसिंह परिहार या चर्चेत आल्या आहेत. त्यांनी मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून डिसेंबर महिन्यात दहावीची परीक्षा दिली होती. या परीक्षेचा निकाल आता जाहीर झाल्या असून, त्या एका विषयात नापास झाल्या आहेत. यावरुन त्यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात असताना त्यांच्या पाठीशीही अनेक जण उभे राहिले आहेत.  

रामबाई या 2018 मध्ये आमदार बनल्या आहेत. त्यांच्या कामाच्या वेगळ्या शैलीमुळे त्या अनेक वेळा चर्चेत असतात. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर फैलावर घेण्याचे प्रकार वारंवार त्यांच्याकडून सुरू असतात. मात्र, जनतेच्या सेवेसाठी त्या अशा प्रकारे वागतात, असे समर्थन त्या करीत असतात. त्यांनी शिक्षण पूर्ण करावे यासाठी त्यांच्या मुलीने आग्रह धरला होता. मुलीमुळेच त्यांनी दहावीचा अर्ज भरला होता. त्यांची मुलगी शिक्षिका आहे. रामबाईंच्या या शिक्षणाच्या जिद्दीचे सोशल मीडियावर कौतुक होत असताना त्यांना ट्रोलही करण्यात येत आहे. 

आमदार रामबाई यांना अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा होती. अखेर मागील वर्षी त्यांनी दहावीची परीक्षा दिली. आता या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यात त्या केवळ एका विषयांत नापास झाल्या आहेत. त्या विज्ञान विषयांत एका गुणाने नापास झाल्या आहेत. रामबाईंना शिक्षण पूर्ण करण्याची प्रेरणा त्यांच्या मुलीपासून मिळाली. त्यांची मुलगी शिक्षिका आहे. याबद्दल बोलताना रामबाई म्हणाल्या की, मला केवळ एका विषयात पास होण्यासाठी एक गुण कमी पडला आहे. माझ्या मुलीपासून मला शिक्षणाची प्रेरणा मिळाली हे माझ्यासाठी महत्वाचे आहे. 

अभियंता तरुणीनं पुढील शिक्षणासाठी डोक्यावर उचललं रोजगार हमीचं घमेलं..!

सोशल मीडियावर रामबाईंना ट्रोल करण्यात आल्यानंतर 'आयपीएस' अधिकारी दीपांशू काबरा त्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, जोपर्यंत तुम्ही हार मानत नाही तोपर्यंत तुम्ही लढत राहता. आमदार रामबाईंना ही एक नवीन आदर्श घालून दिला आहे की जीवनात कधीही पराभव स्वीकारू नये. अनके जण त्यांची चेष्टा करत असतील पण ते त्यांच्या जागी असते तर त्यांनी काय केले असते? ईश्वर त्यांना यशस्वी बनवेल. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख