काँग्रेसला पाठिंबा देणाऱ्या कॉम्प्युटर बाबांचा आश्रम भाजपने केला जमीनदोस्त - madhya pradesh bjp government razes computer baba ashram | Politics Marathi News - Sarkarnama

काँग्रेसला पाठिंबा देणाऱ्या कॉम्प्युटर बाबांचा आश्रम भाजपने केला जमीनदोस्त

वृत्तसंस्था
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

मध्य प्रदेशात मिनी विधानसभा ठरणार पोटनिवडणुका झाल्या आहेत. या निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा देणाऱ्या कॉम्प्युटर बाबांना भाजपने दणका दिला आहे. 

भोपाळ : मध्य प्रदेशातील मिनी विधानसभा ठरलेल्या 28 मतदारंसघातील पोटनिवडणुकांत भाजपला 17 जागा मिळतील, असा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे. उद्या निवडणुकीची मतमोजणी होत असून, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सर्व घडामोडी सुरू असताना राज्यातील भाजप सरकारकडून सुडाचे राजकारण सुरू झाले आहे. काँग्रेसला पाठिंबा देणाऱ्या कॉम्प्युटर बाबांचा आश्रम भाजप सरकारने जमीनदोस्त केला आहे. याच बाबांना भाजप सरकारने 2018 मध्ये राज्यमंत्र्यांचा दर्जा दिला होता. 

नामदेव दास त्यागी ऊर्फ कॉम्प्युटर बाबा हे अतिशय प्रसिद्ध आहेत. त्यांचा इंदोर जिल्ह्यातील जांम्बुर्डी हापसी गावात 43 एकरवर आश्रम होता. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान सरकारने त्याच्यावर कारवाई करीत तो जमीनदोस्त केला. बाबांना 2000 साली ही जमीन गोशाळा स्थापन करण्यासाठी देण्यात आली होती. मात्र, बाबांनी त्या जागेवर दोन एकरात आश्रम बांधला होता. यासाठी त्यांनी 80 कोटी रुपये खर्च केले होते. 

बाबांनी नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांत काँग्रेसचा प्रचार केला होता. यामुळे या कारवाई भाजप सरकारने आकसातून केल्याचा आरोप होत आहे. प्रशासनाने हे आरोप फेटाळून लावले आहेत. उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबांना प्रशासनाने नोटीस बजावली होती. नोटीस बजावूनही त्यांनी अतिक्रमण हटविले नव्हते. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. त्याजागी आता गोशाळा उभारण्यात येणार आहे. 

एक्झिट पोलनुसार, राज्यात काँग्रेसचे सत्तांतर करण्याचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता अतिशय कमी आहे. काँग्रेस नेते कमलनाथ हे या निवडणुकीत भाजप नेते जोतिरादित्य शिंदेंना धक्का देण्यात यशस्वी ठरले तरी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहानांच्या खुर्चीला मात्र, कोणताही धोका नसल्याचे एक्झिट पोलमध्य समोर आले आहे. 

मध्य प्रदेशात 28 विधानसभा मतदारसंघात 3 नोव्हेंबरला पोटनिवडणुका झाल्या. या पोटनिवडणुकांचा निकाल 10 नोव्हेंबरला लागणार आहे. जोतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांच्यासोबत 25 आमदार काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले होते. त्यामुळे कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडले होते. आता हे सर्व आमदार भाजपच्या तिकिटावर उभे असून, तीन मतदारसंघात विद्यमान आमदारांचे निधन झाल्याने पोटनिवडणुका झाल्या. 

एक्झिट पोलनुसार, भाजपला 28 पैकी 17 जागा मिळतील. काँग्रेसला 11 जागा मिळतील. याचा फटका जोतिरादित्य शिंदे यांचा समर्थक आमदारांना बसणार आहे. कमलनाथ हे जोतिरादित्य शिंदे यांना धक्का देण्यात यशस्वी ठरण्याची चिन्हे आहेत. मात्र, शिवराजसिंहाची खुर्ची हलेल हा एवढा मोठा धक्का असणार आहे, असेही चित्र दिसत आहे. 

राज्यातील सत्ता कायम राखण्यासाठी भाजपला केवळ 9 जागा हव्या आहेत. काँग्रेसला पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी पोटनिवडणुकीतील सगळ्या जागा जिंकाव्या लागतील. यानंतर राजकीय समीकरणे बदलू शकतात. कमलनाथ यांच्यावर आता मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. कारण काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या 22 आमदारांना पराभूत करुन सत्त्तांतराचा वचपा त्यांना काढावा लागणार आहे. विधानसभेचे एकूण संख्याबळ 230 आहे. भाजपचे 107 आमदार असून, काँग्रेसचे 87, अपक्ष 4, बहुजन समाज पक्षाचे 2 आणि समाजवादी पक्षाचा 1 आमदार आहे.  

Edited by Sanjay Jadhav 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख