...तर कमलनाथांची हत्या करुन मृतदेहच घरी पाठवला असता; भाजपच्या मंत्र्यांकडून धमकी - madhya pardesh minister threatens congress leader kamal nath | Politics Marathi News - Sarkarnama

...तर कमलनाथांची हत्या करुन मृतदेहच घरी पाठवला असता; भाजपच्या मंत्र्यांकडून धमकी

वृत्तसंस्था
रविवार, 25 ऑक्टोबर 2020

मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या आहेत. 

भोपाळ : मध्य प्रदेशात 28 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका होत आहेत. काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांमध्ये व्यक्तिगत चिखलफेक सुरू झाली आहे. काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना भाजपकडून लक्ष्य केले जात आहे. आता मध्य प्रदेशच्या एका राज्यमंत्र्यानेच कमलनाथ यांना धमकीवजा इशारा दिला आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन काँग्रेसही आक्रमक झाली आहे.  

कमलनाथ यांनी जाहीर सभेत बोलताना माजी मंत्री व भाजपच्या उमेदवार इमरती देवी यांच्याबद्दल आक्षेपार्ह शेरेबाजी केली होती. आमचा येथील उमेदवार तिच्यासारखा नाही...काय बरे तिचे नाव? असा सवाल कमलनाथ यांनी सभेला उपस्थित नागरिकांना केला होता. त्यावेळी नागरिकांना इमरती देवी यांचे नाव घेण्यास सुरूवात केली. यावर कमलनाथ म्हणाले होते की, माझ्यापेक्षा तुम्ही तिला चांगले ओळखता. तुम्ही लोकांनी आधीच मला सावधगिरीचा इशारा द्यायला हवा होता. ये क्या आयटम है. 

यावरुन भाजपने कमलनाथ यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. कमलनाथ यांच्या विधानाचा निषेध करण्यासाठी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आंदोलनही केले होते. याचबरोबर इमरती देवींनी कमलनाथ यांची तुलना भंगारवाल्याशी केली होती. त्यांनी म्हटले होते की, भंगारवाले ज्याप्रमाणे दारु पिऊन बसतात आणि एखादी महिला जात असेल तर तिला आयटम म्हणतात, तशाच प्रकारचे कमलनाथ लोफर आहेत. ते लुच्चे आणि लफंगे आहेत. 

या प्रकरणी मध्य प्रदेशचे कृषी मंत्री गिरीराज दंडोतिया यांनी कमलनाथ यांना धमकीवजा इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, कमलनाथ यांनी केलेले वक्तव्य जर चंबळमधील माता-भगिनींबद्दल कोणी केले असते तर त्याची हत्या करुन त्याचा मृतदेहच घरी पाठवून दिला होता. कमलनाथ यांनी ते वक्तव्य डाबरा येथे केले हे त्यांच्यासाठी चांगले झाले. इमरती देवी या अनुसूचित जातीतील आहेत. मात्र, माता आणि भगिनी कोणत्याही जातीतील असल्या तरी त्या आमच्याच आहेत. 

यावर आक्रमक झालेल्या काँग्रेसने मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना लक्ष्य केले आहे. काँग्रेस आमदार जितू पटवारी यांनी म्हटले आहे की, भाजपकडून राज्यात नवीन पायंडा पाडला जात आहे. त्यांनी लोकशाहीची हत्या केली आहे. दंडोतिया यांच्या विधानाबद्दल मुख्यमंत्र्यांनी माफी मागायला हवी. भाजप जर त्यांच्या विधानाचे समर्थन करीत नसेल तर तातडीने त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी. अन्यथा शिवराजसिंह चौहान हे द्वेष, हत्या आणि जनतेत दुही निर्माण करीत आहेत, असे आम्ही समजू. 

मध्य प्रदेशातील राजकीय वातावरण आता पुन्हा तापू लागले आहे. राज्यात 28 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका होत आहे. या निवडणुका 9 नोव्हेंबरला  होत आहेत. काँग्रेसचे सरकार पाडणाऱ्या भाजपला धडा शिकवण्यासाठी काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी कंबर कसली आहे. राज्यातील भाजप नेत्यांना फोडून ते मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि ज्योतिरादित्य शिंदे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.  

जोतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांच्यासोबत 22 आमदार काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले होते. त्यामुळे कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडले होते. आता राज्यात एकूण 28 मतदारसंघात पोटनिवडणुका होत आहेत. यातील तब्बल 16 ग्वाल्हेर भागातील आहेत. शिंदे यांच्या ग्वाल्हेर या बालेकिल्ल्यात कमलनाथ यांनी काही दिवसांपूर्वी जोरदार शक्तिप्रदर्शनही केले होते. मध्य प्रदेश विधानसभेचे एकूण संख्याबळ 230 असून, सध्या भाजप 107, काँग्रेस 88, अपक्ष 4, बहुजन समाज पक्ष 2 आणि समाजवादी पक्ष 1 असे संख्याबळ आहे. 

Edited by Sanjay Jadhav 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख