काँग्रेस सोडलेले माजी मुख्यमंत्री राज्यसभेवर जाणार अन् विधानसभाही लढणार!

काँग्रेस सोडल्यानंतर माजी मुख्यमंत्र्यांची दोन महिन्यांत राज्यसभेवर वर्णी लागणार आहे. एवढेच नव्हे तर पुढील वर्षी ते विधानसभा निवडणूकही लढवणार आहेत.
Congress
CongressSarkarnama

नवी दिल्ली : गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईजिन्हो फलेरो (Luizinho Faleiro) यांनी सप्टेंबर महिन्यात काँग्रेसला (Congress) रामराम ठोकला होता. नंतर त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) प्रवेश केला होता. त्यांच्यासोबत गोव्यातील काँग्रेसच्या काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. आता फलेरो यांना काँग्रेस सोडल्यानंतर दोनच महिन्यांत राज्यसभेवर (Rajya Sabha) वर्णी लागणार आहे. एवढेच नव्हे तर पुढील वर्षी ते विधानसभा निवडणूकही लढवणार आहेत.

तृणमूल काँग्रेसने फलेरो यांच्या नावाची घोषणा राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी केली आहे. फलेरो हे तृणमूलचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. पश्चिम बंगालमध्ये राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी त्यांना आता उमेदवारी मिळाली आहे. तृणमूलचे संख्याबळ पाहता त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. ही पोटनिवडणूक 29 नोव्हेंबरला होणार आहे. त्यांना पुढील वर्षी होणाऱ्या गोवा विधानसभेच्या निवडणुकीतही पक्ष उतरवणार आहे. फलेरो यांच्या नावाची घोषणा करताना तृणमूल काँग्रेसने ट्विटरवर म्हटले आहे की, संसदेच्या वरिष्ठ सभागृहासाठी लुईजिन्हो फलेरो यांच्या उमेदवारीची घोषणा करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. देशाची सेवा करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना जनता चांगली साथ देईल, असा आम्हाला विश्वास आहे.

फलेरो हे गोवा काँग्रेसचे (Goa Congress) दिग्गज नेते मानले जात होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे अत्यंत विश्वासू म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. त्यांना गोव्यात समन्वय समितीचे अध्यक्ष करण्यात आले होतं. पण त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानं पक्षाला धक्का बसला होता. पुढील वर्षी गोव्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. यापाश्वर्भूमीवर तृणमूल काँग्रेसकडून गोव्यातील निवडणूक लढवली जाणार आहे. फलेरो यांच्यासारखा बडा नेता त्यांच्या गळाला लागला आहे.

Congress
कोरोना लस न घेणं पडणार महागात; रेशन अन् दूधही होणार बंद!

फलेरो यांनी सप्टेंबर महिन्यात कोलकता येथे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत नऊ जणांसह तृणमूलमध्ये प्रवेश केला. त्यावेळी खासदार अभिषेक बॅनर्जीही उपस्थित होते. फलेरो यांच्यासह गोवा काँग्रेसचे माजी सरचिटणीस यतिश नाईक व विजय वासुदेव पोय, माजी राज्य सचिव मारिओ पिंटो डी सँटना व आनंद नाईक, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कवी शिवदास सोनू नाईक, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेते व माजी आमदार लहू मामलेदार, दक्षिण गोवा वकील संघटनेचे अध्यक्ष अँटोनियो मोंटेरिओ क्लोविस दा कोस्टा, राजेंद्र शिवाजी काकोडकर हे तृणमूलमध्ये दाखल झाले होते.

Congress
सगळ्यांनी पेट्रोल स्वस्त केलं, तुम्हीही करा! काँग्रेसचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

गोव्यात 2017 मध्ये काँग्रेसच्या हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास गेला होता. या वेळी पक्षाला गोव्यात सत्ता स्थापन करण्याबाबत अपेक्षा होती. पण दिग्गज नेत्यानं सोडचिठ्ठी दिल्यानं पक्षाला यावेळी इतर नेते व कार्यकर्त्यांना एकसंध ठेवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. 71 वर्षांचे फेलेरो 1998-99 या काळात गोव्याचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या आमदारकीच्या राजीनाम्यामुळे 40 सदस्यांच्या सभागृहात काँग्रेसचे केवळ पाच आमदार उरले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in