लोकसभा अध्यक्षांच्या मुलीला 'आयएएस'ची 'बॅकडोअर एंट्री'? काय आहे नेमकी वस्तुस्थिती... - Lok Sabha Speaker Om Birla daughters back door entry in ias is rumor | Politics Marathi News - Sarkarnama

लोकसभा अध्यक्षांच्या मुलीला 'आयएएस'ची 'बॅकडोअर एंट्री'? काय आहे नेमकी वस्तुस्थिती...

वृत्तसंस्था
मंगळवार, 19 जानेवारी 2021

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची कन्या नुकतीच आयएएस झाली आहे. यावरुन अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. 

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची कन्या अंजली हिने यश मिळवले होते. तिची भारतीय प्रशासकीय सेवेसाठी (आयएएस)  निवड झाली आहे. दरम्यान, अंजलीची 'आयएएस'मध्ये 'बॅकडोअर एंट्री' झाल्याचा दावा करण्यात येत असून, यावरुन मोठा गदारोळ सुरू आहे. प्रत्यक्षातील यातील वस्तुस्थिती मात्र, वेगळीच आहे. 

अंजलीची 'आयएएस'मध्ये 'बॅकडोअर एंट्री' झाल्याचा दावा करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोणत्याही परीक्षेला न बसता अंजली थेटपणे आयएएस झाली, असाही दावा करण्यात येत आहे. तिच्या वडिलांच्या पदाचा फायदा झाला आणि तिला 'बॅकडोअर एंट्री 'देण्यात आली. तिच्यामुळे अनेक सक्षम उमेदवारांची संधी हिरावली गेली, अशी टीकाही करण्यात येत आहे.

अखेर या प्रकरणी 'एएफपी' या वृत्तसंस्थेने अखेर वस्तुस्थिती समोर आणली आहे. प्रत्यक्षात मात्र, वेगळी बाब समोर आली आहे. 'एएफपी'ने म्हटले आहे की, कोणतीही परीक्षा दिल्याशिवाय भारतीय राजकारणी ओम बिर्ला यांची मुलगी आयएएस झाली ही अफवा आहे. अधिकृत कागदपत्रांनुसार, अंजली बिर्लाने 2019 मध्ये पूर्व आणि मुख्य परीक्षा दिली होती. 

लोकसभा अध्यक्षांची मुलगी पहिल्याच प्रयत्नात आयएएस...यशाचे श्रेय मोठ्या बहिणीला

याबाबत अंजलीनेही खुलासा केला आहे. तिने म्हटले आहे की, माझ्याबद्दल सोशल मीडियावर अफवा पसरवल्या जात आहेत. मी ज्यावेळी या अफवा पाहिल्या त्यावेळी मला हसायला आले. अशा प्रकारच्या निराधार आणि निर्बुद्ध गोष्टी मी कधीही पाहिल्या नाहीत. यूपीएससी परीक्षा वर्षभरात तीन टप्प्यांत होते. हे तिन्ही टप्पे तुम्हाला यशस्वीपणे पार करता आले तरच तुमची निवड होते. ही अतिशय पारदर्शक प्रक्रिया असून, यात 'बॅकडोअर एंट्री'सारखा प्रकार नसतो. मी परीक्षा दिल्याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. सर्वसाधारण गटात पहिल्या यादीत केवळ 8 गुण कमी पडल्याने माझे नाव आले नव्हते. नंतरच्या यादीत माझे नाव आले होते. 

अंजलीने रामजस कॉलेजमधून राज्यशास्त्राचे (ऑनर्स) शिक्षण घेतले आहे. तिने 2019 मध्ये यूपीएससी परीक्षा 2019 मध्ये दिली होती. पहिल्याच प्रयत्नात तिला यश मिळाले होते. तिच्या या कामगिरीचे मोठे कौतुक झाले होते. 

यूपीएससीकडून सनदी सेवा परीक्षा दरवर्षी तीन टप्प्यात घेतली जाते. यात पूर्व, मुख्य आणि मुलाखत या तीन टप्प्यांचा समावेश असतो. यातून भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस), भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस) आणि भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) यासह इतर सेवांसाठी निवड केली जाते. 

सनदी सेवांच्या 2019 मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल मागील वर्षी 4 ऑगस्टला जाहीर झाला होता. यात 829 उमेदवार पास झाले होते. त्यांची आयएएस, आयएफएस, आयपीएस आणि केंद्रीय सेवेतील अ व ब गटातील पदांसाठी निवड झाली होती. आयोगाने राखीव 89 उमेदवारांची यादी नंतर जाहीर केली आहे. यात अंजलीचा समावेश आहे.  

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख