चिराग पासवानांनी बाजी पलटवली...काकांसह पाच खासदारांना पक्षातून हाकलले - lok janshakti party removed five mps after there revolt against chirag paswan | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

चिराग पासवानांनी बाजी पलटवली...काकांसह पाच खासदारांना पक्षातून हाकलले

वृत्तसंस्था
मंगळवार, 15 जून 2021

लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांच्याविरोधात पक्षाच्या पाच खासदारांनी बंड केले आहे. 

पाटणा : लोक जनशक्ती पक्षाचे (Lok Janshakti Party) अध्यक्ष चिराग पासवान (Chirag Paswan) यांच्याविरोधात पक्षाच्या पाच खासदारांनी (MP) बंड (Revolt) केले आहे. त्यांचे काका   खासदार पशुपतीकुमार पारस (Pashupati Kumar Paras) यांनी पक्षाच्या बंडखोर खासदारांची बैठक बोलावून चिराग यांची पक्षाच्या अध्यक्षपदावरुन हकालपट्टी केली होती. यावर चिराग यांनी तातडीने पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावून काकांसह पाचही खासदारांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. 

चिराग पासवान हे लोक जनशक्ती पक्षाचे संसदीय नेते, संसदीय मंडळाचे अध्यक्ष आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. चिराग यांची पक्षाच्या अध्यक्षपदावरुन हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा खासदार पारस यांनी केली होती. त्यांच्या जागी सूरज भान यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत नवीन अध्यक्षांची निवड होईपर्यंत भान हे अध्यक्ष राहतील, असाही निर्णय पारस यांनी घेतला होता. 

यावर चिराग यांनी अतिशय वेगाने पावले उचलत पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली. त्यांनी काका पारस यांच्यासह पाचही खासदारांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय या बैठकीत घेतला. यामुळे आता लोक जनशक्ती पक्षात संभ्रमाचे वातावरण आहे. हा वाद न्यायालयात जाण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे. परंतु, सध्या तरी चिराग यांनी बाजी मारल्याचे दिसत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. याबद्दल पक्षाचे नेते राजू तिवारी म्हणाले की, पक्षाच्या खासदारांनी विश्वासघात केला असून, पक्षात प्रत्येक निर्णय घेण्याची एक प्रक्रिया असते आणि तिचे पालन करावे लागते.  

चिराग यांच्याविरूद्ध पशुपती पारस पासवान (काका), प्रिन्स राज (चुलत भाऊ), चंदन सिंह, वीणा देवी आणि मेहबूब अली केशर या पाच खासदारांनी बंड केले आहे. चिराग यांच्यासह पक्षाचे लोकसभेत सहा खासदार आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीच्या काळापासून हे सर्व खासदार चिराग पासवान यांच्यावर नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.  लोक जनशक्ती पक्षाच्या खासदारांनी त्यांचा लोकसभेत वेगळा गट मानावा, अशी मागणी केली आहे. चिराग पासवान यांच्याऐवजी दुसरा नेता नेमण्याची मागणीही त्यांनी केली आहे.यामुळे पक्षाचे नेते आणि संसदीय नेते अशी दोन्ही पदेही चिराग यांच्याकडून काढून घेण्याची रणनीती पारस यांनी आखली होती. 

हेही वाचा : नितीशकुमारांनी सूड उगवला...चिराग पासवानांची अवस्था ना घरका ना घाटका 

लोक जनशक्ती पक्षाचे संस्थापक रामविलास पासवान यांचे मागील वर्षी निधन झाले. त्यानंतर पक्षाची धुरा त्यांचे पुत्र चिराग पासवान यांच्याकडे आली. आता रामविलास पासवान यांच्या निधनानंतर वर्षभरातच पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आहे. ही फूट पाडण्याचे सूत्रधार दुसरे-तिसरे कुणी नसून, चिराग यांचे काका पशुपतीकुमार पारस आहेत. पशुपती हे रामविलास यांचे लहान बंधू आहेत. 

पशुपती आणि चिराग यांच्यात मागील काही काळापासून बेबनाव आहे. ते अनेक दिवसांपासून एकमेकांशी बोलत नसून, ते पत्रव्यवहाराद्वारे संवाद साधत आहेत. पशुपती हे पहिल्यांदाच खासदार म्हणून हांजीपूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. आता या काका आणि पुतण्याच्या वादामुळे बिहारमधील राजकारण ढवळले गेले आहे.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख