नितीशकुमारांनी सूड उगवला; चिराग पासवान यांची अवस्था 'ना घरका ना घाटका'

लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांच्याविरोधात पक्षाच्या पाच खासदारांनी बंड केले आहे. या बंडामागे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा हात आहे.
lok janshakti party five mps may join janata dal united
lok janshakti party five mps may join janata dal united

पाटणा : लोक जनशक्ती पक्षाचे (Lok Janshakti Party) अध्यक्ष चिराग पासवान (Chirag Paswan) यांच्याविरोधात पक्षाच्या पाच खासदारांनी (MP) बंड (Revolt) केले आहे. हे खासदार संयुक्त जनता दलाच्या (JDU) वाटेवर असल्याचे समजते. या बंडामागे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) यांचा हात असून, त्यांनी अखेर चिराग यांच्यावर सूड उगवला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

चिराग पासवान यांनी विधानसभा निवडणुकीवेळी राज्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडीशी (एनडीए) फारकत घेत राष्ट्रीय पातळीवर भाजपसोबत राहण्याची भूमिका घेतली होती. त्यांनी नितीशकुमार यांच्या जेडीयूच्या काही जागा कमी करण्यात यश मिळवले होते. पासवान हे सतत नरेंद्र मोदी यांचे तोंडभरून कौतुक करीत होते. त्यांची भाजपशी छुपी युती असल्याचीही चर्चा होती. मात्र, निवडणूक संपल्यानंतर भाजपने पासवान यांचा दूर झटकले होते. भाजपची बी टीम असा शिक्का लोक जनशक्ती पक्षावर मारण्यात आला होता. यामुळे पक्षाला विधानसभा निवडणुकीतही यश मिळाले नाही. 

चिराग पासवान यांच्यामुळे जेडीयूला विधानसभा निवडणुकीत मोठा फटका बसला होता. लोक जनशक्ती पक्षाने राज्यभरात भाजपच्या विरोधात उमेदवार दिले नव्हते. मात्र, जेडीयूच्या विरोधात उमेदवार दिले होते. अनेक भाजप नेत्यांनी पक्ष सोडून लोक जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून जेडीयू उमेदवारांच्या निवडणूक लढवली होती. याचबरोबर चिराग पासवान यांनी सातत्याने नितीशकुमार यांना लक्ष्य केले होते. यामुळे जेडीयूचा अनेक ठिकाणी पराभव झाला होता. 

मागील काही दिवसांपासून नितीशकुमार यांनी आक्रमकपणे पक्ष विस्तारासाठी पावले उचलण्यास सुरवात केली आहे. त्यांनी आधी लोक जनशक्ती पक्षाचे  १८ जिल्हाध्यक्ष आणि पाच प्रदेश सरचिटणीसांसह २०८ नेत्यांना या आधी फोडले होते. त्यानंतर आता खासदार फोडले आहेत. बिहारच्या मुख्यमंत्रिपदी पुन्हा नितीशकुमार हेच राहिले तरी भाजप नेते सुशीलकुमार मोदी यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यात आले नव्हते. यामुळे नाराज असलेल्या मोदींना अखेर भाजपने राज्यसभा उमेदवारी देऊन त्यांचे पुर्नवसन केले. या पुनर्वसनाची मोठी किंमत चिराग पासवान यांना मोजावी लागली. या सर्व प्रकरणात पडद्यामागील सूत्रधार नितीशकुमार असल्याची चर्चा होती. 

लोक जनशक्ती पक्षाचे संस्थापक रामविलास पासवान यांचे मागील वर्षी निधन झाले. त्यानंतर पक्षाची धुरा त्यांचे पुत्र चिराग पासवान यांच्याकडे आली. आता रामविलास पासवान यांच्या निधनानंतर वर्षभरातच पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आहे. ही फूट पाडण्याचे सूत्रधार दुसरे-तिसरे कुणी नसून, चिराग यांचे काका पशुपतीकुमार पारस आहेत. पशुपती हे रामविलास यांचे लहान बंधू आहेत. त्यांना केंद्रीय मंत्री करण्याचे आश्वासन नितीशकुमार यांनी दिले आहे. 

लोक जनशक्ती पक्षाच्या खासदारांनी त्यांचा लोकसभेत वेगळा गट मानावा, अशी मागणी केली आहे. चिराग पासवान यांच्याऐवजी दुसरा नेता नेमण्याची मागणी त्यांनी केली आहे.  चिराग यांच्याविरूद्ध बंड केलेले खासदार म्हणजे पशुपती पारस पासवान (काका), प्रिन्स राज (चुलत भाऊ), चंदन सिंह, वीणा देवी आणि मेहबूब अली केशर. बिहार विधानसभा निवडणुकीच्या काळापासून हे सर्व खासदार चिराग पासवान यांच्यावर नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com