मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा..खासदारांनी कुर्ता खरेदी केला अन् म्हणाले, राज को राजही रहने दो! - ljp mp pashupati kumar paras may be inducted in union cabinet | Politics Marathi News - Sarkarnama

मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा..खासदारांनी कुर्ता खरेदी केला अन् म्हणाले, राज को राजही रहने दो!

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 जुलै 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून केंद्रीय मंत्रिमंडळाचा मेगाविस्तार होणार आहे. या विस्ताराच्या हालचालींना गती मिळाली आहे. 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडून केंद्रीय मंत्रिमंडळाचा (Union Cabinet) मेगाविस्तार होणार आहे. विस्ताराच्या हालचालींना गती मिळाली असून, मंत्रिपदाच्या शर्यतीत असलेले अनेक नेते दिल्लीत दाखल होऊ लागले आहेत. लोक जनशक्ती पक्षात (LJP) फूट पाडणारे खासदार पशुपतीकुमार पारस (Pashupati Kumar Paras) यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची चर्चा असून, तेही तातडीने दिल्लीत दाखल झाले आहेत.  

लोक जनशक्ती पक्षाचे संस्थापक रामविलास पासवान यांचे पारस हे बंधू आहेत. रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग हे पक्षाची धुरा सांभाळत आहेत. चिराग यांच्याविरोधात पारस यांनी उघड बंड पुकारले होते. लोक जनशक्ती पक्षातील या फुटीमागे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या हात असल्याची चर्चा सुरू आहे. आता पारस यांचा समावेश केंद्रीय मंत्रिमंडळात होण्याची शक्यता आहे. यामुळे पारस हे दिल्लीत दाखल झाले आहेत. 

पारस हे आज सकाळी एका दुकानात कुर्ता खरेदी करताना दिसले. यावर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्याकडे विचारणा केली. त्यावर त्यांनी राज को राजही रहने दो, असे सूचक वक्तव्य केले. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पारस यांनी फोन केला होता. त्यामुळे ते तातडीने काल सायंकाळी विमाने दिल्लीत दाखल झाले आहेत. 

हेही वाचा : महाकाल मंदिरात पूजा करुन जोतिरादित्य शिंदेंनी गाठलं दिल्लीचं विमान 

लोक जनशक्ती पक्षाचे संस्थापक रामविलास पासवान यांचे मागील वर्षी निधन झाले. त्यानंतर पक्षाची धुरा त्यांचे पुत्र चिराग पासवान यांच्याकडे आली. आता रामविलास पासवान यांच्या निधनानंतर वर्षभरातच पक्षात फूट पडली आहे. ही फूट पाडण्याचे सूत्रधार दुसरे-तिसरे कुणी नसून, चिराग यांचे काका पशुपतीकुमार पारस आहेत. पशुपती हे रामविलास यांचे लहान बंधू आहेत. 

बिहारमधील मागील विधानसभा निवडणुकीत चिराग यांनी भाजपला विरोध न करता मुख्यमंत्री नितिशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाला (जेडीयू) विरोध केला होता. त्यावेळी त्यांनी भाजपला पाठिंबा आणि जेडीयूला विरोध अशी भूमिका घेतली होती. स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवून घेणाऱ्या चिराग यांना विधानसभा निवडणुकीत अपयश मिळाले. त्यानंतर त्यांच्या वडिलांच्या मृत्यूमुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर भाजपने सुशीलकुमार मोदी यांना उभे केले होते. 

चिराग यांच्याविरूद्ध पशुपती पारस पासवान (काका), प्रिन्स राज (चुलत भाऊ), चंदन सिंह, वीणा देवी आणि मेहबूब अली केशर या पाच खासदारांनी बंड केले आहे. चिराग यांच्यासह पक्षाचे लोकसभेत सहा खासदार आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीच्या काळापासून हे सर्व खासदार चिराग पासवान यांच्यावर नाराज होते.  यामुळे पक्षाचे नेते आणि संसदीय नेते अशी दोन्ही पदेही चिराग यांच्याकडून काढून घेण्याची खेळी पारस यांनी खेळली होती. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख