पंतप्रधान बनण्यासाठी नितीशकुमार गोळा करताहेत दारू तस्करांकडून पैसा... - ljp chief chirag paswan targets bihar chief minister nitish kumar | Politics Marathi News - Sarkarnama

पंतप्रधान बनण्यासाठी नितीशकुमार गोळा करताहेत दारू तस्करांकडून पैसा...

वृत्तसंस्था
सोमवार, 2 नोव्हेंबर 2020

बिहारच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीत राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत. 

पाटणा : बिहारच्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील दारुबंदीचा मुद्दा गाजू लागला आहे. दारुबंदी असल्याने दारुची तस्करी तेजीत असल्याचे चित्र आहे. या मुद्द्यावर लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवानांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी लक्ष्य केले आहे. या सगळ्यामागे नितीशकुमार असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे. 

चिराग पासवान म्हणाले की, राज्यातील दारुबंदी करुन दोन नंबरने दारु विकण्याचा कारभार नितीशकुमार करीत आहेत. त्यांना 2014 मध्ये पंतप्रधान बनण्याचे वेध लागले आहेत. आपली राजकीय महत्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी दारु तस्करांकडून पैसा गोळा करीत आहेत. याचवेळी निरपराध व्यक्तींना अडकवण्यासाठी दारुबंदी कायद्याचा सर्रास वापर केला जात आहे. 

राज्यात पूर्ण दारुबंदी का नाही, असा प्रश्न उपस्थित करीत चिराग पासवान यांनी म्हटले आहे की, बिहारमध्ये एकही व्यक्ती बोलू शकत नाही की दारुबंदी कायदा लागू आहे. दिल्लीहून आलेले प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी राज्यातील दारुबंदीची खिल्ली उडवत आहेत. आमचा दारुबंदीचे समर्थन करणारा असला तरी दारुबंदीच्या नावाखाली तस्करांकडून दारुची विक्री करणे योग्य नाही. पुढील सरकार याची चौकशी करेल. 

बिहार विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यांत होत आहे. पहिला टप्पा २८ ऑक्टोबरला झाला असून, यात ७१ मतदारसंघ होते. दुसरा टप्पा  ३ नोव्हेंबरला असून, यात ९४ मतदारसंघ आहेत. तिसरा टप्पा ७ नोव्हेंबर असून, यात ७८ मतदारसंघ आहेत. निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत.  बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस आणि डावे यांची महाआघाडी असे चित्र आहे.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) एलजेपी बाहेर पडला आहे. चिराग पासवान यांनी राष्ट्रीय स्तरावर आणि लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत राहण्याची भूमिका घेतली आहे. परंतु, बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पातळीवर जेडीयूसोबत वैचारिक मतभेद असल्याचे कारण देत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, भाजपचे मोठ्या प्रमाणात बंडखोर नेते एलजेपीत दाखल झाले आहेत. ते जेडीयूच्या विरोधात मैदानात उतरले आहेत. यामुळे भाजप आणि चिराग पासवान यांची छुपी युती असल्याची चर्चा सुरू आहे.

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख