भाजपला मत द्या पण नितीशकुमारांना नको..! - LJP chief Chirag Paswan says vote for bjp but dont vote for nitish kumar | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपला मत द्या पण नितीशकुमारांना नको..!

वृत्तसंस्था
शनिवार, 7 नोव्हेंबर 2020

बिहारच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आज शेवटच्या टप्प्यातील मतदान होत आहे. 

पाटणा : बिहारच्या विधानसभेसाठी शेवटच्या टप्प्यातील मतदान आज सुरू आहे. प्रचाराच्या तोफा थंडावल्या असल्या तरी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहेत. लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री नितीशकुमारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपला मतदान करा पण नितीकुमारांच्या संयुक्त जनता दलाला नको, असे जाहीर आवाहन चिराग पासवान यांनी आज केले.  

राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) एलजेपी बाहेर पडला आहे. चिराग पासवान यांनी राष्ट्रीय स्तरावर आणि लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत राहण्याची भूमिका घेतली आहे. परंतु, बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पातळीवर जेडीयूसोबत वैचारिक मतभेद असल्याचे कारण देत चिराग पासवान हे स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत. मात्र, भाजपचे मोठ्या प्रमाणात बंडखोर नेते एलजेपीत दाखल झाले आहेत. ते जेडीयूच्या विरोधात मैदानात उतरले आहेत. यामुळे भाजप आणि चिराग पासवान यांची छुपी युती असल्याची चर्चा सुरू आहे. 

चिराग पासवान यांनी आज जाहीरपणे भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, मतदानाच्या पहिल्या दोन टप्प्यात बिहारच्या जनतेने विकास आणि बदलाला मतदान केले आहे. बिहारी जनतेच्या विरोधात भूमिका घेणाऱ्यांनी धडा शिकवण्याची वेळ आली आहे. आपण त्यांना आणखी राज्याची वाट लावू देऊ शकत नाही. राज्याला पुढे नेण्यासाठी तुम्ही मतदान करा. लोक जनशक्ती पक्ष आणि भाजपचे उमेदवार एकत्रितपणे आघाडीवर आहेत. 

नितीशकुमारांवर हल्लाबोल करताना चिराग पासवान म्हणाले की, मागील पाच वर्षांत काय केले हे सुद्धा नितीशकुमारांनी जनतेला सांगितले नाही. पाच वर्षांनी थेट तुमचा आर्शीवाद मागायला ते आले आहेत. आता ते निवृत्तीच्या मार्गावर आहेत. त्यामुळे तुमचा आर्शीवाद घेतल्यानंतर ते कुठेच दिसणार नाहीत. पुढील पाच वर्षे त्यांना काहीच करण्याची गरज असणार नाही. 

भाजपच्या उमेदवारांच्या विरोधात काम करून संयुक्त जनता दलाचे नेते विश्वासघात करीत आहेत. माझे तुम्हा सर्वांना आवाहन आहे की, तुम्ही भाजपला मत द्या. संयुक्त जनता दलाला दिलेले एकही मत परिवर्तन घडवू शकणार नाही. राज्याची स्थिती आहे तशीच राहील, अशी टीका चिराग पासवान यांनी केली. 

बिहार विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यांत होत आहे. पहिला टप्पा २८ ऑक्टोबरला झाला असून, यात ७१ मतदारसंघ होते. दुसरा टप्पा 3 नोव्हेंबरला झाला असून, यात ९४ मतदारसंघ होत. तिसरा टप्पा आज सुरू असून, यात ७८ मतदारसंघ आहेत. निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत.  बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस आणि डावे यांची महाआघाडी असे चित्र आहे.

बिहारमधील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि महाआघाडीला टक्कर देण्यासाठी ग्रँड डेमोक्रॅटिक सेक्युलर फ्रंट स्थापन करण्यात आला आहे. राष्ट्रीय लोक समता पक्षाचे उपेंद्र कुशवाह हे फ्रंटचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत. यात ओवेसी यांचा ऑल  इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमीन (एआयएमआयएम), मायावती यांचा बहुजन समाज पक्ष (बसप), सुहेलदेव भारतीय समाज पार्टी, सामाजिक जनता दल (डेमोक्रॅटिक) आणि जनतांत्रिक पार्टी (सोशालिस्ट) समावेश आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख