मोदी, शहांनी विनंती करुनही चिराग पासवानांनी ऐकले नाही - ljp chief chirag paswan rejects request by narendra modi and amit shah | Politics Marathi News - Sarkarnama

मोदी, शहांनी विनंती करुनही चिराग पासवानांनी ऐकले नाही

वृत्तसंस्था
रविवार, 4 ऑक्टोबर 2020

बिहारमधील विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. राजकीय पक्षांची आघाड्यांची जुळवाजुळव सुरू असताना त्यात बिघाडी होण्याचेच प्रकार सध्या सुरू आहेत. अखेर एनडीएमध्ये फूट पडली आहे. 

नवी दिल्ली : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू), भाजप आणि लोक जनशक्ती पक्षाच्या (एलजेपी) राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस आणि डावे यांची महाआघाडी असे चित्र दिसेल अशी अपेक्षा होती. मात्र, केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या एलजेपीने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी एलजेपीचे अध्यक्ष चिराग पासवान यांची समजूत घालण्यासाठी केलेला प्रयत्न निष्फळ ठरला आहे. 

कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे बिहारमधील विधानसभा निवडणूक या वेळी राजकीय पक्षांच्या व्हर्च्युअल प्रचारामुळे गाजणार आहे. बिहार विधानसभेची मुदत २९ नोव्हेंबरला संपत आहे. एकूण तीन टप्प्यांत ही निवडणूक होत आहे. पहिला टप्पा २८ ऑक्टोबरला होणार असून, यात ७१ मतदारसंघ आहेत. दुसरा टप्पा  ३ नोव्हेंबरला असून, यात ९४ मतदारसंघ आहेत. तिसरा टप्पा ७ नोव्हेंबरला असून, यात ७८ मतदारसंघ आहेत. निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत.  

यंदाच्या निवडणुकीत बिहारमध्ये वेगळे राजकीय चित्र पाहायला मिळणार आहे. मागील निवडणुकीवेळी सहकारी असलेले पक्ष आता विरोधात मैदानात आहेत. मागील वेळी लालूप्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा जेडीयू आणि काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र होते. त्यावेळी भाजपने लोकजनशक्ती पक्ष, राष्ट्रीय लोकसमता पक्षासोबत आघाडी केली होती. मागील निवडणुकीच नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए)  विजय झाला होता. या विजयानंतर काही महिन्यांमध्येच नितीश यांनी लालूंच्या पक्षाची साथ सोडत भाजपसोबत आघाडी केली होती. यामुळे विरोधी बाकांवरील भाजप आणि लोक जनशक्ती पक्ष सत्तेत आला होता. 

या निवडणुकीत आरजेडी हा काँग्रेसला सोबत घेऊन महाआघाडीचे नेतृत्व करत आहे. आधी या महाआघाडीचे घटक असलेले जितनराम मांझी आता एनडीएमध्ये गेले आहेत. याचवेळी एनडीएमधील एलजेपीने वाढीव जागा मिळाव्यात म्हणून आग्रह धरला आहे. लोक जनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांनी जास्त जागा मिळाव्यात म्हणून आग्रही भूमिका घेतली. त्यांच्या या भूमिकेमुळे एनडीएचे जागावाटप लांबत चालले होते. 

या पार्श्वभूमीवर एलजेपीच्या नेत्यांच्या बैठक आज पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखाली झाली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे रामविलास पासवान या वेळी उपस्थित राहू शकले नाहीत. या बैठकीनंतर पक्षाने निवेदन जाहीर केले आहे. यात म्हटले आहे की, राष्ट्रीय स्तर आणि लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत आमची भक्कम आघाडी आहे. परंतु, बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पातळीवर आमचे जेडीयूसोबत वैचारिक मतभेद आहेत. यामुळे आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणुकीनंतर आमचे विजयी उमेदवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या मार्गावर भाजपसोबत असतील. 

बिहारमध्ये जेडीयूच्या उमेदवार ज्या मतदारसंघात असेल तेथे विरोधात एलजेपी उमेदवार देणार आहे. मात्र, राज्यात भाजपचा उमेदवार असेल तेथे विरोधात उमेदवार न देता पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचबरोबर केंद्राप्रमाणे राज्यातही भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार बनावे, असे एलजेपीने म्हटले आहे. एलजेपीने आता विरोध केला असला तरी निकालानंतर  भाजपसोबत जाण्याचे सूतोवाच केले आहे. एलजेपीच्या या भूमिकेमुळे नितीशकुमार  आणि भाजपसमोरील अडचणी वाढल्या आहेत. 

रामविलास पासवान यांची काल हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून ते रुग्णालयात दाखल आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय  गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षणमंत्री राजनाथसिंह चिराग पासवान यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. त्यांनी रामविलास पासवान यांच्या प्रकृतीची विचारपूस केली, असे पक्षाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या नेत्यांनी चिराग यांच्याशी बिहारमधील जागावाटपाबाबत चर्चा केली. चिराग यांनी ठाम भूमिका घेऊन नितीशकुमार यांना विरोध कायम राहील, असे त्यांना सांगितले. तिन्ही नेत्यांनी समजूत घालण्याचा प्रयत्न करूनही पासवान यांनी ऐकले नाही. त्यांनी एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय कायम ठेवला. 

Edited by Sanjay Jadhav
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख