मुख्यमंत्री येडियुरप्पांचा केंद्रातील भाजप नेतृत्वालाच दे धक्का! - lingayat seers warns central government against replacing yediyurappa-sj84 | Politics Marathi News - Sarkarnama

मुख्यमंत्री येडियुरप्पांचा केंद्रातील भाजप नेतृत्वालाच दे धक्का!

वृत्तसंस्था
बुधवार, 21 जुलै 2021

मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांना पदावरुन हटवण्यासाठी पक्ष नेतृत्वाने हालचाली सुरू केल्या आहेत. 

बंगळूर : कर्नाटकात (Karnataka) भाजपमधील (BJP) अंतर्गत मतभेद दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) यांना पदावरुन हटवण्यासाठी पक्ष नेतृत्वाने हालचाली सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर येडियुरप्पांनी लिंगायत मठांच्या प्रमुखांना आपल्या पाठीशी उभे केले आहे. मुख्यमंत्र्यांना हटवल्यास राज्यातील लिंगायत समाजात असंतोष निर्माण होईल, असा दबाव त्यांनी पक्ष नेतृत्वावर आणण्यास सुरवात केली आहे. 

येडियुरप्पा यांना मुख्यमंत्री पदावरुन हटवण्यासाठी भाजपच्या नेतृत्वाकडून पावले उचलण्यास सुरवात झाली आहे. येडियुरप्पा यांना यासाठी दिल्लीलाही बोलावून घेण्यात आले होते. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही त्यांनी चर्चा केली होती. राज्यात परतल्यानंतर येडियुरप्पांनी लिंगायत कार्ड खेळले आहे. राज्यातील लिंगायत समाजाचे नेतृत्व म्हणून येडियुरप्पांना पाहिले जाते. पक्षीय भिंती ओलांडूनही अनेक पक्षांतील नेते लिंगायत नेते म्हणून येडियुरप्पांना मान्यता देतात. 

येडियुरप्पांनी राज्यातील लिंगायत मठांच्या प्रमुखांची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर सर्व मठाधिपतींनी येडियुरप्पा यांना मुख्यमंत्री पदावरुन हटवू नये, असा इशारा भाजप नेतृत्वाला दिला. स्वामी श्रीगेरे सनेहळ्ळी म्हणाले की, प्रत्येक राज्य सरकारने स्वतंत्रपणे काम करणे अपेक्षित आहे. परंतु, केंद्र सरकार हस्तक्षेप करु लागल्यास मुख्यमंत्री चांगले काम करु शकत नाहीत. वारंवार मुख्यमंत्री बदलल्यास अधिकाऱ्यांना काम करणे अवघड बनते. केंद्र सरकारने याचा गांभीर्याने विचार करावा आणि मुख्यमंत्र्यांना त्यांचे काम करु द्यावे. 

येडियुरप्पांनी बोलावलेल्या बैठकीला वीरशैव-लिंगायत समाजाचे मठाधिपती उपस्थित होते. याचबरोबर समाजातील राजकीय नेतेही उपस्थित होते. राज्यात या समाजाची लोकसंख्या 16 टक्के असून, या समाजाचा भाजपला पाठिंबा आहे. याचवेळी येडियुरप्पांनाही या समाजातून अधिक मान्यता आहे. येडियुरप्पांनी  मठाधिपतींना आपल्या पाठीशी उभे करुन केंद्रातील भाजप सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आव्हान देण्याची भूमिका घेतली आहे. 

हेही वाचा : काँग्रेसमध्ये उभी फूट...सिद्धूंचे 63 तर कॅप्टन यांचे केवळ 15 आमदार 

येडियुरप्पा यांना नुकतेच पक्ष नेतृत्वाने दिल्लीला पाचारण केले होते. त्यांनी पक्षाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही येडियुरप्पा यांनी भेट घेतली. या भेटीत येडियुरप्पांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. यासाठी येडियुरप्पांनी प्रकृतीचे कारण पुढे केले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

पक्षाच्या नेतृत्वाची भेट घेतल्यानंतर येडियुरप्पांना प्रसारमाध्यांनी राजीनाम्याबाबत विचारणा केली होती. यावर त्यांनी कुठला राजीनामा, असा प्रतिप्रश्न माध्यमांना केला होता. ते म्हणाले होते की, मी पंतप्रधानांना भेटलो आहे. राज्यातील विकासकामांबाबत त्यांच्याशी चर्चा झाली आहे. मी पुन्हा ऑगस्टमध्ये दिल्लीत परत येणार आहे. राजीनाम्याचा बातम्यांना अजिबात महत्व नाही. राज्यातील नेतृत्व बदलाबाबत कोणताही चर्चा झालेली नाही. मला कुणीही राजीनामा देण्यास सांगितलेले नाही.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख