एम्सचे डॉक्टर म्हणतात सुशांतची 200 टक्के हत्याच; विकाससिंह यांचा दावा - lawyer vikas singh says aiims doctor claims sushant singh rajput was murdered | Politics Marathi News - Sarkarnama

एम्सचे डॉक्टर म्हणतात सुशांतची 200 टक्के हत्याच; विकाससिंह यांचा दावा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूवरुन सुरू असलेला गदारोळ अद्याप कायम आहे. त्याची आत्महत्या की हत्या हे गूढ अद्याप उकललेले नाही. 

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागासोबत (सीबीआय) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) तीन न्यायवैद्यक तज्ज्ञांनी सुशांतच्या मुंबईतील घराची तपासणी केली होती. याचबरोबर सुशांतच्या व्हिसेराची तपासणीही 'एम्स'च्या पथकाने केली आहे. हे पथक सीबीआयला अहवाल देणार असून, यातून सुशांतची हत्या की आत्महत्या याचा नेमका उलगडा होणार आहे. आता सुशांतच्या कुटुंबीयांचे वकील विकाससिंह यांनी या प्रकरणी मोठा दावा केला आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करणारे सीबीआयचे पथक दिल्लीला परतले आहे. याचबरोबर या प्रकरणी सीबीआयला तपासात मदत करण्यासाठी मुंबईला गेलेले एम्सच्या न्यायवैद्यक तज्ज्ञांचे पथकही दिल्लीत परतले आहे. एम्सच्या पथकाने हा अहवाल तयार केला असून, हे पथक लवकरच आपला अहवाल सीबीआयकडे सुपूर्द करेल. सीबीआयने सुशांतच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करणाऱ्या कूपर रुग्णालयातील डॉक्टरांचीही चौकशी केली होती.  

सीबीआयने दोन वेळा सुशांतच्या मृत्यूच्या वेळचा घटनाक्रम त्याच्या फ्लॅटमध्ये तयार करुन पुन्हा तपासला आहे. त्यानंतर सीबीआयच्या पथकासमवेत 'एम्स'च्या तीन न्यायवैद्यक तज्ञांनी नुकतीच मुंबईतील सुशांतच्या घराची तपासणी केली होती. या वेळी पथकाने नीरज, केशव आणि सिद्धार्थ या तिघांना सोबत नेले होते. तसेच, सुशांतची बहीण मितू सिंह हिचीही या वेळी उपस्थिती होती. फ्लॅट आणि इमारतीच्या छताची काही काळ तपासणी त्यांनी केली होती. 

सुशांतप्रकरणी दिल्लीतील 'एम्स'चे न्यायवैद्यक विभाग तपासात मदत करीत आहे. या पथकाने सुशांतच्या मृत्यूची वेळ शवविच्छेदन अहवालात नसल्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. सुशांतच्या मृत्यूचे नेमके कारण शोधून याचा अहवाल एम्सचे पथक सीबीआयला देणार आहे. या अहवालावर आता तपास यंत्रणांची भिस्त आहे. एम्सच्या पथकाने सुशांतच्या व्हिसेराची तपासणी केली आहे. याचा अहवाल एम्सचे पथक सीबीआयला देणार आहे. यातून सुशांतवर विषप्रयोग झाला का याची माहितीही मिळेल. सुशांतच्या शरीरावरील जखमांची तपासणीही एम्सने केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

सुशांतच्या कुटुंबीयांचे वकील विकाससिंह यांनी सुशांतची हत्या झाल्याचा दावा केला आहे. सुशांतच्या आत्महत्येचे प्रकरण आता हत्या म्हणून सीबीआय का नोंद करीत नाही, असा सवालही त्यांनी केला आहे. ते म्हणाले की, सुशांतच्या मृतदेहाची छायाचित्रे मी एम्सच्या न्यायवैद्यक तज्ज्ञांनी पाठिवली होती. त्या डॉक्टरांनी सुशांतची 200 टक्के हत्या झाली असल्याचे म्हटले आहे. सुशांतच्या गळ्यावरील खुणांच्या आधारे त्याने आत्महत्या केली नसून, त्याची हत्या झाल्याचे त्या डॉक्टरांनी सांगितले होते. आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा आता हत्येत रुपांतरित करण्यास सीबीआयला एवढा का वेळ लागत आहे? 

यावर एम्सच्या न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता म्हणाले म्हणाले की, सुशांतच्या गळ्यावर खुणा होत्या. मात्र, त्यांच्या आधारे सुशांतची आत्महत्या अथवा हत्या हे सांगणे शक्य नाही. या खुणा आत्महत्या अथवा हत्येमुळे पडल्या असाव्यात हे सुद्धा सांगता येणार नाही. या प्रकरणी हत्या झाली हे सिद्ध करण्यासाठी आम्हाला आणखी पुरावे लागतील. 

'एम्स'च्या न्यायवैद्यक विभागाच्या अहवालाबाबत भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनीही काही  प्रश्न उपस्थित केले होते. त्यांनी म्हटले होते की, सुशांतचा मृत्यू हा आत्महत्या की हत्या होता हे एम्सच्या अहवालातून स्पष्ट होईल, असे काही पोलीस अधिकारी सांगत आहेत. सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात त्यांच्या मृतदेह 'एम्स'च्या पथकाच्या हाती होता. मात्र, सुशांतप्रकरणी त्याच्या मृतदेहावर आधीच अंत्यसंस्कार झाले आहेत. 'एम्स'चे पथक केवळ कूपर रुग्णालयातील डॉक्टरांनी काय केले अथवा नाही याबद्दल सांगू शकते.  

सुशांत हा 14 जूनला मुंबईतील घरी मृतावस्थेत सापडला होता. याचा तपास मुंबई पोलिस करीत होते. या प्रकरणी पोलिसांनी 56 जणांचे जबाब नोंदविले होते. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा समावेश होता. 

Edited by Sanjay Jadhav
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख