सुशांत प्रकरणी 'एम्स'चा अहवालच चुकीचा; विकाससिंह यांचा दावा

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी तीन केंद्रीय यंत्रणा तपास करीत आहेत. साडेतीन महिन्यांनंतरही या प्रकरणातील गूढ कायम आहे.
lawyer Vikas Singh raises doubt over aiims report in sushant singh rajput case
lawyer Vikas Singh raises doubt over aiims report in sushant singh rajput case

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) अहवाल  सादर केला आहे. सुशांतने आत्महत्या केली असून, त्याची हत्या झाली नसल्याचा निष्कर्ष सीबीआयने 'एम्स'च्या अहवालाच्या आधारे काढल्याची चर्चा सुरू झाली होती. या प्रकरणी सुशांतच्या कुटुंबीयांचे वकील विकाससिंह सीबीआयच्या संचालकांना पत्र लिहिले असून, 'एम्स'च्या अहवालावरच प्रश्न उपस्थित केले आहेत. 

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) पथकाने सुशांतच्या मृत्यूबाबत सीबीआयकडे अहवाल सादर केला आहे. मुंबई पोलिसांनी दिलेला सुशांतचा शवविच्छेदन अहवाल आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपासणी करुन 'एम्स'च्या पथकाने हा अहवाल तयार केला आहे. हा अहवाल आणि या प्रकरणातील इतर पुराव्यांच्या आधारे सीबीआय अंतिम निष्कर्षापर्यंत पोचणार आहे. 'एम्स'च्या अहवालात सुशांतवर विषप्रयोग झाला नसल्याची बाबही नमूद करण्यात आली आहे. यामुळे सुशांतने आत्महत्या केली असून, त्याची हत्या झाली नसल्याचा निष्कर्ष सीबीआयने काढला आहे, अशी चर्चा सुरू होती. 

सुशांतच्या शरीरावर गळफासाव्यतिरिक्त कोणतीही इतर जखम नव्हती. याचबरोबर त्याचा कोणाशी संघर्ष अथवा झटापट झाल्याच्याही शरीरावर कोणत्याही खुणा आढळलेल्या नाहीत. त्याच्या कपड्यांवरही अशा प्रकारच्या खुणा सापडलेल्या नाहीत, असे 'एम्स'च्या न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांनी स्पष्ट केले होते. यावर सीबीआयने खुलासा केला आहे. सीबीआयने म्हटले आहे  की, सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास अजून सुरू आहे. सर्व पैलू काळजीपूर्वक तपासून पाहण्याचे काम सुरू आहे. सीबीआयने याबाबत अद्याप कोणताही अंतिम निष्कर्ष काढलेला नाही. 

सुशांतने आत्महत्या केली होती, अशा निष्कर्षापर्यंत सीबीआय पोचल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत विकाससिंह यांनी सीबीआयच्या संचालकांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, सुशांतचे शवविच्छेदन 'एम्स'ने केलेले नाही. ते कूपर रुग्णालयात झाले. यामुळे प्रत्यक्ष सुशांतच्या मृतदेहाची तपासणी 'एम्स;ला करता आला नाही. कूपर रुग्णालयात सुशांतचे शविविच्छेदन रात्री करण्यात आले. त्यासाठी न्यायदंडाधिकाऱ्यांची परवानगी घेण्यात आलेली नव्हती. याचबरोबर शवविच्छेदनाचे व्हिडीओ रेकॉर्डिंगही करण्यात आलेले नव्हते. 

'एम्स'चे डॉ.सुधीर गुप्ता या संवेदनशील प्रकरणी पहिल्या दिवसांपासून माध्यमांना मुलाखती देत आहेत. कूपर रुग्णालयातील डॉक्टरांनी केलेले संशयास्पद शवविच्छेदन आणि महाराष्ट्र पोलिसांनी शवविच्छेदनासाठी केलेली घाई यावर गुप्ता आधी बोलले आहेत. गुप्ता यांनी सीबीआयला सादर केलेल्या अहवालातील माहिती माध्यमांनी उघड केली आहे. गुप्ता यांचे वर्तन चुकीचे आहे. यामुळे या अहवालाबाबत सर्वांच्याच मनात संशय निर्माण झाला आहे, असे विकाससिंह यांनी म्हटले आहे.  

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com