मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अद्याप तपासाची प्रगती जाहीर केलेली नाही. सुमारे साडेसात महिन्यांनतरही सुशांतच्या मृत्यूचे गूढ कायम आहे. आता सुशांतचा मामेभावावर भरदिवसा गोळीबार झाल्याची घटना बिहारमधील सहरसा येथे घडली आहे. यात सुशांतच्या मामेभावासह आणखी एक जण जखमी झाला असून, दोघांचीही प्रकृती चिंताजनक आहे.
सुशांतचा मामेभाऊ राजकुमारसिंह आणि त्याचा सहकारी अली हसन हे दोघे काल (ता.30) मोटारीतून मधेपुरा जिल्ह्याकडे जात होते. त्यावेळी दुचारीवरुन आलेल्या तिघांनी त्यांच्यावर गोळीबार केला. राजकुमार आणि अली हसन यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघांचीही प्रकृती चिंताजनक आहे.
राजकुमार याची सहरसा, मधेपुरा आणि सुपौल या जिल्ह्यांत यामाहा दुचाकींचा शोरुम आहेत. तो दररोज या शोरुमला भेट देतो. सहरसा कॉलेज जवळील बैजंतपूर चौकात त्यांची मोटार पोचल्यानंतर पाठीमागून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांना ओव्हरटेक केले. त्यांनी दोघांवर गोळीबार करुन पलायन केले. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
या विषयी बोलताना सहरसाच्या पोलीस अधिक्षिका लिपी सिंह म्हणाल्या की, प्रथमदर्शनी हा मातमत्तेच्या वादातून झालेला प्रकार दिसत आहे. यामागे खंडणी मागण्याचाही प्रकार असू शकतो. आम्ही सर्व बाजूंनी तपास करीत आहोत. आमच्या हाती काही ठोस धागेदोरे लागले असून, लवकरच आम्ही हल्लेखोरांना अटक करु.
सुशांत हा 14 जूनला मृतावस्थेत आढळला होता. या प्रकरणी सुरूवातीला मुंबई पोलीस तपास करीत होते. मुंबई पोलिसांनी हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, अभिनेत्री कंगना राणावत, भाजपचे खासदार सुब्रह्मण्यम स्वामी आणि राज्यातील भाजप नेत्यांनी सुशांतची हत्या झाल्याचा दावा केला होता.
सुशांत मृत्यू प्रकरणात नंतर बिहार सरकारनेही उडी घेतली होती. बिहारमध्ये एफआयआर दाखल करुन तेथील पोलीस पथक तपासासाठी मुंबईत दाखल झाले होते. हा तपास सीबीआयकडे सोपवावा यासाठी विरोधी पक्ष भाजपने आणि बिहार सरकारने आक्रमक भूमिका घेतली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाने हा तपास सीबीआयकडे सोपवला होता.
Edited by Sanjay Jadhav

