लालूंची प्रकृती चिंताजनक; तातडीने दिल्लीला 'एम्स'मध्ये हलवणार - Lalu Prasad Yadav health worsens to be shifted in new delhi aiims | Politics Marathi News - Sarkarnama

लालूंची प्रकृती चिंताजनक; तातडीने दिल्लीला 'एम्स'मध्ये हलवणार

वृत्तसंस्था
शनिवार, 23 जानेवारी 2021

राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव हे एका गैरव्यवहार प्रकरणात शिक्षा भोगत आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. 

रांची : राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांची प्रकृती चिंतानजक आहे. त्यांची तब्येत आणखी ढासळू लागल्याने त्यांना दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) तातडीने हलवण्यात येणार आहे. 

लालू हे सध्या कारागृहात शिक्षा भोगत आहेत. मात्र, प्रकृती ढासळल्याने त्यांना रांचीतील राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये (रीम्स) दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या फुफ्फुसात संसर्ग झाला आहे. लालूंना एम्समध्ये दाखल करण्यात येईल, असे रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीने म्हटले आहे. याचबरोबर त्यांना दिल्लीला हलवण्यासाठी कारागृह प्रशासन स्थानिक न्यायालयाची परवानगीही घेणार आहे.  

शिक्षा भोगत असलेले लालू रुग्णालयातून बंगल्यात पोचले कसे? 

लालूंवर उपचार करणारे रीम्समधील डॉ. उमेश प्रसाद यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल नुकताच लेखी अहवाल दिला होता. या अहवालानुसार, लालूंची किडनी केवळ 25 टक्केच काम करीत आहे. त्यांची प्रकृती कोणत्याही क्षणी ढासळू शकते. किडनीची काम करण्याची क्षमता कधीही कमी होऊ शकते आणि ती नेमकी कधी कमी होईल, हे सांगता येणार नाही. 

लालूंना मागील 20 वर्षांपासून मधुमेह आहे. हा आजार दिवसेंदिवस बळावत आहे. त्यांचे अवयव अतिशय वेगाने खराब होत आहेत. यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक बनत आहे. रीम्समधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना लालूंच्या प्रकृतीचा अहवाल सादर करण्यात आला आहे, असे अहवालात म्हटले होते. 

चारा गैरव्यवहार प्रकरणी लालू हे शिक्षा भोगत आहेत. झारखंड उच्च न्यायालयाने त्यांच्या जामिनावरील सुनावणी 21 जानेवारीपर्यंत पुढे ढकलली आहे. लालूंना 30 ऑगस्ट 2018 रोजी रीम्समध्ये दाखल करण्यात आले होते. चारा गैरव्यवहारप्रकरणी शिक्षा झाल्यानंतर ते बिरसा मुंडा मध्यवर्ती कारागृहात शरण आले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख