बिहारच्या निकालाच्या चिंतेने लालूंची तब्येत ढासळली - lalu prasad yadav health deteriorates due to tension of bihar election | Politics Marathi News - Sarkarnama

बिहारच्या निकालाच्या चिंतेने लालूंची तब्येत ढासळली

वृत्तसंस्था
रविवार, 8 नोव्हेंबर 2020

बिहारच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली आहे. या निवडणुकीत तेजस्वी यादव हे सत्तास्थापना करतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहेत. असे असताना त्यांचे पिता लालूप्रसाद यादव यांची प्रकृती ढासळली आहे. 

पाटणा : बिहारमध्ये सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू) - भाजपची राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) - काँग्रेसच्या महाआघाडीत सत्तेसाठी रस्सीखेच राहणार आहे. सर्वच एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीचे पारडे जड दिसत आहे. असे असताना आरजेडीचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांची तब्येत मात्र, बिघडली आहे. बिहारच्या निवडणुकीच्या चिंतेमुळे त्यांची प्रकृती ढासळत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  

लालूप्रसाद यादव यांची प्रकृती अचानक ढासळली आहे. त्यांना मधुमेह असून, क्रिएटिनची पातळी अचानक वाढली आहे. झारखंडची राजधानी रांचीतील रिम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. उमेश प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, लालूंच्या तब्येतीतील घसरण सुरूच राहिल्यास त्यांचे डायलिसिस करावे लागू शकते. ही माहिती रुग्णालयाने उच्च न्यायालयालाही दिली आहे. लालूंच्या प्रकृतीचा अहवाल उच्च न्यायालयाने रुग्णालयाकडे मागितला होता. 

रिम्समधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लालूंची किडनी सध्या 25 टक्केच काम करीत आहे. काही दिवसांपासून किडनीचे काम करणे 10 टक्क्यांनी कमी झाले आहे. यात  आणखी 10 ते 12 टक्के घसरण झाल्यास त्यांचे तातडीने डायलिसिस करावे लागेल. 

कोरोना प्रार्दुभावाच्या धोका असल्याने लालूंना एम्स रुग्णालयात उपचारासाठी पाठवता येऊ शकत नाही. लालूंची तब्येत बिघडण्यामागे मानसिक तणावाचेही कारण आहे. बिहारच्या निवडणुकीवरुन ते सतत चिंतित असून ते खाण्यापिण्यावरही लक्ष देत नाहीत, असे सूत्रांनी सांगितले. 

टुडेज चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडीला मोठे यश मिळेल. महाआघाडीतील आरजेडी 180, काँग्रेस 11 जागा आणि एनडीएतील भाजप 55 आणि जेडीयू 11 जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. इतर पक्षांना 8 आणि अपक्षांना 4 जागा मिळतील, असेही म्हटले आहे. 

ईटीजीच्या एक्झिट पोलनुसार, एनडीएला 114, महाआघाडीला 120, लोक जनशक्ती पक्षाला 3 आणि इतरांना 6 जागा मिळतील. टीव्ही 9 भारतवर्षच्या एक्झिट पोलनुसार एनडीएला 115, महाआघाडीला 120, लोक जनशक्ती पक्ष 4 आणि इतरांना 4 जागा मिळतील. 

इंडिया टु़डे - माय अॅक्सिस एक्झिट पोलनुसार मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत तेजस्वी यादव हे आघाडीवर आहेत. तेजस्वी यादव यांना 44 टक्के, नितीशकुमार यांना 35 टक्के आणि चिराग पासवान यांना 7 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. जनतेकडून मुख्यमंत्रिपदासाठी तेजस्वी यादव यांनाच पसंती असल्याचे म्हटले आहे. 

टाईम्स नाऊ - सी व्होटरच्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला 116 जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. याचवेळी महाआघाडीला 120 जागा मिळतील, असे म्हटले आहे. लोक जनशक्ती पक्षाला केवळ एक जागा मिळेल असे म्हटले असून, इतरांना सहा जागा मिळतील. 

रिपब्लिक टीव्ही जन की बातच्या एक्झिट पोलनुसार आरजेडीला बिहारमध्ये सर्वाधिक जागा मिळतील. एनडीएला 91 ते 117, महाआघाडीला 118-138, लोक जनशक्ती पक्ष 5 ते 8 आणि इतरांना 3 ते 6 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. बिहारच्या विधानसभेचे संख्याबळ 243 असून, बहुमतासाठी 122 जागा आवश्यक आहेत. 

बिहार विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यांत होत आहे. पहिला टप्पा २८ ऑक्टोबरला झाला असून, यात ७१ मतदारसंघ होते. दुसरा टप्पा 3 नोव्हेंबरला झाला असून, यात ९४ मतदारसंघ होत. तिसरा टप्पा आज झालाअसून, यात ७८ मतदारसंघ होते निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत.  बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस आणि डावे यांची महाआघाडी असे चित्र आहे.

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख