मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) आज कारवाई केली आहे. रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात सरनाईक यांनी विधिमंडळात हक्कभंग मांडला होता. तसेत, अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाचा पुन्हा तपास करण्याची मागणीही त्यांनीच केली होती. यामुळे सरनाईक यांच्याविरोधात ईडीची कारवाई सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने थेट शिवेसनेचे खासदार संजय राऊत यांना सवाल केला आहे.
कंगनाच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकाम मुंबई महापालिकेने पाडले होते. जेसीबीच्या सहाय्याने हे बांधकाम पाडण्यात आले होते. यावरुन मोठा गदारोळ उडाला होता. कंगनाने मुंबई महापालिकेसह शिवसेनेला या प्रकरणात लक्ष्य केले होते. संजय राऊत आणि कंगना यांच्यातही जुंपली होती. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने नुकताच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याशी 'शट अप या कुणाल' या कार्यक्रमात संवाद साधला होता. या कार्यक्रमात अभिनेत्री कंगना राणावतच्या बंगल्याचा भाग जेसीबीने पाडल्याचा उल्लेखही होता.
कंगनाच्या बंगल्यावरील कारवाईच्या सामनातील बातमीची फ्रेम कामरा याने काही दिवसांपूर्वी ट्विटरवर शेअर केली आहे. या बातमीचे शीर्षक उखाड दिया असे होते आणि त्याखाली संजय राऊत यांची सही होती. कामरा याने ट्विटमध्ये कंगना राणावत तुमचीही यावर सही मिळेल का, असा सवाल केला होता. कामरा याने कंगनावर निशाणा साधल्याने सोशल मीडियावर चर्चा सुरू होती.
आता आमदार सरनाईक यांच्यावरील कारवाईवरुन मोठा गदारोळ सुरू आहे. सरनाईक यांचे मुंबई तसेच ठाणे येथील कार्यालय आणि घरी ईडीने आज सकाळी छापे टाकले. सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक, विहंग सरनाईक यांच्या घरीदेखील ईडीने छापे टाकले. शिवसेना नेत्यांनी या प्रकरणी केंद्रातील भाजप सरकारला जबाबदार धरले आहे.
सरनाईक यांनी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मांडला होता. याचबरोबर गोस्वामी यांच्याविरोधात अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाचा पुन्हा तपास करण्याचीही मागणी त्यांनी केली होती. याचमुळे सरनाईक यांच्याविरोधात ईडीकडून कारवाई सुरू असल्याची चर्चा आहे.
या पार्श्वभूमीवर कुणाल कामराने थेट संजय राऊतांना सवाल केला आहे. कामराने ट्विटरवर गोस्वामी यांचा उल्लेख गोबरस्वामी असा केला. त्याने म्हटले आहे की, संजय राऊत सर गोबरस्वामीच्या कार्यालयाकडे जाताना तुमचा जेसीबी ट्राफिकमध्ये का अडकला आहे, याबद्दल माहिती द्याल का?
Edited by Sanjay Jadhav

