'उखाड दिया'वर कुणाल कामराने थेट मागितली कंगनाला सही..! - kumal kamra requests kanagana ranaut signature on ukhaad diya frame | Politics Marathi News - Sarkarnama

'उखाड दिया'वर कुणाल कामराने थेट मागितली कंगनाला सही..!

वृत्तसंस्था
बुधवार, 18 नोव्हेंबर 2020

अभिनेत्री कंगना राणावतच्या बंगल्यावरील कारवाईवरुन मोठा गदारोळ उडाला होता. आता यावरुन कुणाल कामरा याने कंगनावर निशाणा साधला आहे.  
 

मुंबई : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने नुकताच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याशी 'शट अप या कुणाल' या कार्यक्रमात संवाद साधला होता. या कार्यक्रमात अभिनेत्री कंगना राणावतच्या बंगल्याचा भाग जेसीबीने पाडल्याचा उल्लेखही होता. आता कामरा याने कंगनाच्या बंगल्यावरील कारवाईच्या बातमीची फ्रेम ट्विटरवर शेअर केली आहे. यावर संजय राऊत यांची सही असून, त्यावर कंगनाची सही कामरा याने मागितली आहे. 

कंगनाच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकाम मुंबई महापालिकेने पाडले होते. जेसीबीच्या सहाय्याने हे बांधकाम पाडण्यात आले होते. यावरुन मोठा गदारोळ उडाला होता. कंगनाने मुंबई महापालिकेसह शिवसेनेला या प्रकरणात लक्ष्य केले होते. संजय राऊत आणि कंगना यांच्यातही जुंपली होती. कुणाल कामरा याने काही दिवसांपूर्वी राऊत यांच्याशी संवाद साधला होता. या कार्यक्रमात कंगना राणावतच्या बंगल्यावरील कारवाईचाही उल्लेख होता. 

कंगनाच्या बंगल्यावरील कारवाईच्या सामनातील बातमीची फ्रेम कामरा याने आता ट्विटरवर शेअर केली आहे. या बातमीचे शीर्षक उखाड दिया असे असून, त्याखाली संजय राऊत यांची सही आहे. कामरा याने ट्विटमध्ये कंगना राणावत तुमचीही यावर सही मिळेल का, असा सवाल केला आहे. कामरा याने कंगनावर निशाणा साधला असून, यावर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. आता कंगना याला काय उत्तर देते याची उत्सुकता आहे.  

अभिनेत्री कंगना राणावत हिच्या वादग्रस्त वक्तव्यांवरुन मोठा गदारोळ उडाला होता. वादग्रस्त वक्तव्ये केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार वांद्रे पोलिसांनी कंगना आणि तिची बहीण रंगोली चंडोली यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. भावाच्या लग्नाचे कारण समोर करुन कंगनाने चौकशीला हजर राहण्यास मुदतवाढ मागितली होती. आता मुंबई पोलिसांनी कंगना आणि रंगोली यांना तिसऱ्यांदा समन्स बजावले आहे. या वेळी ती चौकशीला हजर राहणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

कंगनाने मुंबईबद्दल वादग्रस्त वक्तव्य करुन वाद ओढवून घेतला होता. यामुळे कंगना आणि शिवसेना यांच्यात जोरदार सामना रंगला होता. यात कंगनाच्या बाजूने भाजप नेते मैदानात उतरले होते. तिने थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. तिने राज्यपालांसमोर गाऱ्हाणे मांडून, न्याय देण्याची मागणी केली होती. त्यानंतर कंगना मुंबई सोडून हिमाचल प्रदेशमधील तिच्या घरी परतली होती. तेथूनही तिने ट्विटरवर वादग्रस्त वक्तव्यांची मालिका कायम ठेवली होती. 

कंगनाने दोन समाजात तेढ पसरवणारे वक्तव्य केल्याप्रकरणी तिच्याविरुद्ध वांद्य्रातील महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली होती. यावर न्यायालयाने कंगना आणि तिची बहीण रंगोली चंडेल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन तपास करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले होते. याआधी सुशांतसिंह प्रकरणात कंगनाने मुंबई पोलिसांना लक्ष्य केले होते. आता तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन चौकशीचे आदेश न्यायालयानेच मुंबई पोलिसांना दिल्याने कंगना चांगलीच अडचणीत आली आहे. 

न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार वांद्रे पोलिसांनी कंगना आणि रंगोली यांच्याविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. यात देशद्रोहाचा गुन्हाही त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. कंगना आणि रंगोली यांना मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्यावेळी त्या दोघींनी भावाचे लग्नाचे कारण पुढे करीत चौकशीला हजर राहण्यास मुदतवाढ मागितली होती. त्यानंतर पुन्हा एकदा चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. या समन्सला त्यांनी उत्तरच दिले नव्हते. 
 
आता पुन्हा दोघींना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे. त्यांना २३ व २४ नोव्हेंबरला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. दरम्यान, कर्नाटक पोलिसांना न्यायालयाच्या आदेशानुसार कंगनाविरोधात एफआयआर दाखल केला आहे. तिच्यावर दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण करणे, जाणीवपूर्वक अपमान करणे, चिथावणी देणे आदी कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख